|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » महादेवांचा महारासांत प्रवेश

महादेवांचा महारासांत प्रवेश 

भगवान श्रीकृष्ण वृंदावनात करीत असलेल्या महारासाची गुंज सर्व त्रिलोकात पोहोचली. ही वार्ता हा हा म्हणता कैलासावर जाऊन पोचली. भगवान श्रीकृष्णाच्या मधुर बासरीच्या ध्वनीने मोहीत होऊन भोलानाथांची समाधी भंग पावली. मुरलीच्या नादाच्या चुंबकीय आकर्षणाने भोलेबाबा शंकरांची पावले साहजिकच वृंदावनाकडे वळली. भगवान शिवांबरोबर पार्वतीमाताही निघाली. दोघेही वृंदावनातील  रासक्रीडेच्या ठिकाणी पोहोचले. पार्वतीदेवीने रासात सहज प्रवेश केला. पण महादेवाला गोपींनी रासात प्रवेश करण्यापासून रोखले. गोपी म्हणाल्या-महाराज! या महारासांत श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणत्याही पुरुषाला प्रवेश करण्यास परवानगी नाही.

भोलेनाथ म्हणाले-आम्हाला तर श्रीराधा आणि श्रीकृष्णाच्या दर्शनाची तीव्र लालसा आहे. शिवजी ज्यावेळी अगदीच गयावया करू लागले, तेव्हा ललिता नामक गोपीला त्यांची दया आली. ती शिवांना म्हणाली-आपण महारास पाहू इच्छिता तर आपल्याला गोपी व्हावं लागेल. यमुनेत स्नान करून गोपीचे रूप धारण करून रासक्रीडेत प्रवेश करता येईल. मग काय! महादेवांनी लागलीच यमुनेत स्नान केले आणि गोपी व्हायला तयार झाले. ललिताने महादेवाला बिंदी लावली, कानांत कुंडले घातली, हातात कांकणे घातली, गोपीचा वेश घातला आणि महादेवाच्या कानात राधाकृष्ण या युगलमंत्राची दीक्षा दिली.  महादेव गोपी बनले. पण महादेवाच्या लांब जटा आणि दाढी मिशा कशा झाकणार? ललिताने महादेवाला एक लांबलचक दुपट्टा दिला. महादेवाने ओढणीने आपला चेहरा झाकला आणि रासक्रीडेत हळूच प्रवेश केला.

महादेवाचे लंबेचौडे, धष्टपुष्ट शरीर पाहून गोपिकांना आश्चर्य वाटले की ही कोण एवढी दणकट गोपी रासक्रीडेत आली? ह्या एकदम वेगळय़ा आणि विचित्र दिसणाऱया गोपीकडे सगळय़ांच्या नजरा वळल्या. महादेवांना वाटले की आता श्रीकृष्ण आपल्याला पाहील तर सगळे भांडे फुटेल, श्रीकृष्ण तर मुळातच मोठय़ा विनोदी स्वभावाचे! त्यांना हे केव्हाच कळले होते की शिवजी रासक्रीडेत आले आहेत आणि सर्व गोपिकांच्या पाठीमागे लपून बसले आहेत. त्यांनी लगेच जाहीर केले की आता नृत्याला पाठीमागून सुरुवात होईल. हे ऐकताच भोलेबाबा घाबरले आणि पदर सावरत धावत सर्व गोपींच्या पुढे जाऊन उभे राहिले. हे पहाताच श्रीकृष्ण म्हणाले आता हे नृत्य गोपींच्या पुढील रांगेपासून सुरू होईल. पुन्हा महादेव धावत धावत मागच्या रांगेत घुसले. श्रीकृष्णाने पुन्हा जाहीर केले की नृत्य पाठीमागून सुरू होईल. पुन्हा महादेवांनी पळापळ केली. असे काही काळ चालूच राहिले, तेव्हा सगळय़ा गोपी आश्चर्याने उभ्याच राहिल्या आणि शिव हरीतील ही विहंगम लीला पाहू लागल्या. त्या मनात विचार करू लागल्या की ही गोपी तर मस्त दांडगी आहे, मग एवढी लाजते कुणाला पाहून? आणि अशी पळते कशापायी?

शेवटी भगवंताने जाहीर केले की नृत्याची सुरुवात या चंचल गोपीपासूनच होईल जी स्थिर राहत नाही आहे. असे म्हणून त्यांनी महादेवांना पकडलेच.

Ad.  देवदत्त परुळेकर