|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेड रेल्वेस्थानकात प्रवाशांचा हंगामा

खेड रेल्वेस्थानकात प्रवाशांचा हंगामा 

‘मांडवी’च्या आरक्षित डब्यांचेही दरवाजे न उघडल्याने प्रवासी संतप्त,

जलद गाडय़ांतून प्रवास करण्याची दिली मूभा

प्रतिनिधी /खेड

मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास खेड स्थानकात दाखल झाल्sाr. मात्र आरक्षित डब्यांचेही दरवाजे न उघडल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. जोपर्यंत आपली मुंबईला जाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत एकही रेल्वेगाडी मुंबईच्या दिशेने जावू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांनी स्थानकप्रमुखांना धारेवर धरले. अखेर पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी मध्यस्थी करत आरक्षित तिकिटधारक प्रवाशांना जलद गाडय़ांतून प्रवास करण्याची मूभा दिल्यानंतर प्रवासी शांत झाले.

मुंबईच्या दिशेने धावणाऱया सर्वच रेल्वेगाडय़ा हाऊसफुल्लच धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. पोलीस यंत्रणेसह रेल्वेच्या विशेष कृती दलाची फौज दिमतीला असतानाही रेल्वेगाडय़ांचे दरवाजे उघडले जात नसल्याने तासन्तास तिष्ठत बसणाऱया प्रवाशांचा संताप अनावर होत आहे. आधीच रेल्वेगाडय़ा 4 ते 5 तास उशिराने धावत असताना त्यात दरवाजेच उघडले जात नसल्याने चाकरमान्यांची अडथळय़ांची शर्यत कायमच राहिली आहे.

मांडवी एक्सप्रेस येथील स्थानकात दाखल झाल्यानंतर आरक्षित तिकिटधारकांना आरक्षित डब्यातही प्रवेश न मिळाल्याने प्रवासी संतप्त झाले. मांडवी एक्सप्रेस मार्गस्थ झाल्यानंतर त्यांनी स्थानकप्रमुखांना जाब विचारत रेल्वे प्रशासनाच्या नावाने एकच हंगामा केला. संतप्त प्रवासी रेल्वे अधिकाऱयांचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सरतेशेवटी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले. आरक्षित तिकिटधारक प्रवाशांना वेरावल एक्सप्रेस व जबलपूर एक्सप्रेस या दोन जलद गाडय़ांतून प्रवास करण्याची मूभा देण्यात आली. दरम्यान, मुंबईच्या दिशेने जाणारी सावंतवाडी-दिवा पॅसेंजरदेखील 4 तास विलंबानेच धावत होती.