|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » परतीच्या प्रवासात चाकरमान्यांचा उद्रेक!

परतीच्या प्रवासात चाकरमान्यांचा उद्रेक! 

महामार्गावर मैलोन्मैल रांगा

बस, रेल्वेस्थानकांवर तोबा गर्दी

रत्नागिरीत दादर पॅसेंजर साडेतीन तास रोखली

खेडमध्ये रेल्वे प्रवाशांचा संताप अनावर

प्रतिनिधी /रत्नागिरी

पाच दिवसांच्या गणरायाला सोमवारी निरोप देऊन निघालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात असंख्य अडचणी निर्माण होत आहेत. महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा त्यातच प्रचंड खड्डे रस्त्याने जाणाऱया चाकरमान्यांना हैराण करत आहेत. प्रचंड गर्दीमुळे रत्नागिरीसह चिपळूण व खेड स्थानकांवर रेल्वेप्रवाशांची दैना उडत असून वारंवार हातघाईचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यातच खासगी गाडय़ांनी मोठी भाडेवाढ केली आहे. एसटी, रेल्वे प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. त्याला पोलीस दलाचेही सहकार्य मिळत आहे. मात्र कोकणात जमलेल्या भक्तसागराला सामावून घेण्याचे प्रशासनाचे विविध दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत.

दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेषतः चिपळूणपासून पुढील प्रवासात काही ठिकाणी वाहतुकीच्या खोळंब्याने प्रवासी हैराण झाले होते. महाड, वडखळ, पेण परिसरात 2 ते 3 तास रखडण्याची वेळ वाहनचालकांवर आली. खड्डेमय महामार्गाच्या जोडीला वाहतुकीच्या खोळंब्याने परतीच्या प्रवासात चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. काही चालकांनी पुणे-मुंबई मार्गाचा थोडा लांबचा पर्याय निवडला मात्र त्या मार्गावरही गर्दीमुळे प्रवासाला विलंब होत होता. त्यातच या मार्गावर टोलनाक्यांवर टोल मागितला जात असल्याने शाब्दिक चकमकी उडाल्याचेही वृत्त आहे.

रत्नागिरीत पॅसेंजर रोखली

मुंबईकडे परतीच्या प्रवासाला लागलेल्या चाकरमान्यांच्या गर्दीमुळे रत्नागिरी रेल्वेस्थानकावर मंगळवारी सकाळी मोठा गोंधळ उडाला. मुंबईकडे जाणारी दादर पॅसेंजर सिंधुदुर्गहून अगोदरच खचाखच भरून आली होती. त्यामुळे बसायला जागा नसल्याने येथील रेल्वेप्रवाशांनी पॅसेंजरच्या आरक्षित डब्यांमध्ये शिरकाव केला, परंतु कुणीही खाली उतरण्यास तयार नव्हते. अशा प्रसंगी हट्टामुळे प्रवाशांनी तब्बल साडेतीन तास दादर पॅसेंजर रोखून धरत जोरदार हुल्लडबाजी केली. अखेर हतबल झालेल्या रेल्वे प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करत परिस्थितीवर नियंत्रण राखण्यात यश मिळवले. त्यानंतर ही पॅसेंजर मुंबईकडे रवाना झाली.

साडेतीन तासांची विनवणी

या पॅसेंजरमध्ये संगमेश्वर, चिपळूण, खेडसाठी डबे आरक्षित असतात. मात्र गाडी सिंधुदुर्गहून प्रवाशांनी पूर्ण भरून आली होती. अनारक्षित डब्यांमध्ये तर बोट शिरायलाही जागा नव्हती. त्यामुळे रत्नागिरी स्थानकावरील प्रवासी आरक्षित डब्यांमध्ये घुसले व ते खाली उतरायला तयार नव्हते. रेल्वे सूत्रांकडून वारंवार ध्वनीक्षेपकांद्वारे आवाहन करूनहे प्रवासी खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाला साडेतीन तास आटोकाट प्रयत्न करावे लागले.

प्रवाशांची घोषणाबाजी

प्रवासी खाली न उतरल्याने पॅसेंजर पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे पुढच्या स्थानकांवर पुन्हा हंगामा झाला असता. यामुळे रेल्वे प्रशासनही पेचात पडले. प्रवासी हट्टास पेटल्याने पॅसेंजरचा खोळंबा झाला. सकाळी साडेपाच वाजता सुटणाऱया पॅसेंजरसाठी अनेक प्रवासी सोमवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरी स्थानकावर येऊन बसले होते. रत्नागिरीतल्या प्रवाशांना जागा नसेल तर आम्ही जायचं कुठे, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून केला जात होता. प्रवाशांनी घोषणाबाजी देत रेल्वे स्टेशनवर गोंधळ घालण्यास प्रारंभ केला.

पोलिसांचा हस्तक्षेप

प्रवासी काही ऐकायला तयार नव्हते. रेल्वे प्रशासनाच्याविरोधात घोषणा देत रेल्वे रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांना पचारण करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह पोलीस आणि विशेष दलाची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. यावेळी पोलिसी बळाचा वापर करायला लावू नका, असे आवाहन केले. शेवटी नाईलाजास्तव प्रवासी खाली उतरल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

रेल्वे प्रशासनाने पॅसेंजरचे तिकीट काढलेल्या सर्व प्रवाशांना त्याच दरामध्ये इतर गाडय़ांमधून प्रवासाची मुभा दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी 8.45 वा. सुमारास गाडी स्थानकातून रवाना झाली. सणांमध्ये कितीही गाडय़ा वाढवल्या तरी हा प्रश्न उभा ठाकत असल्यामुळे यावर ठोस मार्ग काढण्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

पर्यायी रेल्वेगाडय़ांच्या डब्यातून प्रवाशांना करण्यात आले रवाना

मंगळवारी 300-325 अनारक्षित / प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनी मडगाव-रत्नागिरी-दादर पॅसेंजर आरएन येथे आरक्षित कोच ताब्यात घेतले होते. हे कोच रिकामे केले नाहीत तर आवश्यक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. प्रवाशांनीही सहकार्य केले आणि ट्रेन 8ः45 वाजता मार्गस्थ झाली. गर्दीच्या सोयीसाठी, प्रवाशांना अतिरिक्त शुल्काशिवाय एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. रत्नागिरी येथे मंगला एक्सप्रेस, केरळ संपत क्रांती एक्सप्रेस आणि पोरबंदर एक्स्प्रेस मध्ये प्रवाशांना प्रवेश देण्यात आला.

एसटीकडून चाकरमान्यांसाठी करंट बुकींगची सुविधा

चाकरमानी मोठय़ा संख्येने परतीच्या प्रवासासाठी लागले आहेत. एसटीनेही प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी नियोजन केल्याचे येथील विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सांगण्यात आले. ऑनलाईन आरक्षणाबरोबरच रत्नागिरी व चिपळूण येथे करंट बुकींगची सुविधा ठेवण्यात आली आहे. सोमवारी नियमित जादा फेऱयांपेक्षा 158 तर मंगळवारी 750 जादा बसफेऱया जिल्हाभरातून सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

खासगी ट्रव्हल्सकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर

सणांचा व सुट्टय़ांचा काळ हेरून खासगी टॅव्हल्स प्रवासी तिकीटांच्या दरात मोठी वाढ केली जाते. यावेळीही चाकरमान्यांच्या खिशाला मोठी चाट बसत आहे. सुमारे 1200 ते 1400 रु. एवढा तिकीट दर आकारला जात असल्याने प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

रत्नागिरीतून नवीन रेल्वेगाडीसाठी प्रयत्नशीलः सामंत

रत्नागिरी रेल्वेस्थानकावरून प्रवास करणाऱया प्रवाशांना पुढील प्रवासासाठी मोठय़ा अडचणीला समोर जावे लागते. याबाबत खासदार विनायक राऊत यांनादेखील कल्पना दिली आहे. रत्नागिरीहून मुंबईकडे जाण्यासाठी स्वतंत्र कमी डब्याच्या रेल्वेसाठी आपण प्रयत्नशील आहोत असे म्हाडाचे अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांनी सांगितले.