|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रेल्वे सिग्नलची वायर अज्ञाताने तोडली

रेल्वे सिग्नलची वायर अज्ञाताने तोडली 

रेल्वे प्रशासनाकडून घातपाताचा संशय

रेड सिग्नलने मडगाव-मुंबई रेल्वे थांबली

 

प्रतिनिधी /महाड

तालुक्यातील टोळ गावाच्या हद्दीतील कोकण रेल्वे मार्गावर सिग्नलची वायर अज्ञाताने तोडल्याची घटना सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे मिळालेल्या रेड सिग्नलमुळे पहाटे मडगाव-मुंबई रेल्वे थांबवण्यात आली. या घटनेमागे घातपात असल्याचा संशय रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पहाटे मडगाव-मुंबई ही कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी करंजाडी रेल्वेस्थानकामधून निघाली. मात्र पुढे काही मिनिटात सिग्नलच्या यंत्रणेमध्ये बिघाड झाला. त्यामुळे चालकाने गाडी उभी केली. काही तरी बिघाड झाला असल्याचे वीर स्टेशन मास्तरांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सिग्नलची वायर तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. स्टेशन मास्तर दीपक बनसोडे यांनी गाडी वीर स्थानकात आणून उभी केली. या सर्व प्रकाराबाबत प्रशासनाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

अज्ञाताने सिग्नलची वायर तोडल्याने रेड सिग्नल लागून राहिला आणि त्यामुळे चालकाने गाडी उभी केली. करंजाडी रेल्वेस्थानक मास्तरांनी सिग्नल दिल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी निघालेली असताना अचानक गाडी थांबल्याचे स्टेशन मास्तरांच्या निदर्शन आले. ज्या ठिकाणी गाडी थांबवण्यात आली होती, त्या ठिकाणी त्वरित पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला. त्यावेळी वीर-करंजाडीदरम्यान मडगाव-मुंबई ही ‘कोकण कन्या’ सिग्नलजवळ उभी करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. अज्ञाताने सिग्नलची वायर तोडल्यामुळे रेड सिग्नल सुरु झाला. त्यामुळे रेल्वे थांबवण्यात आली. यामागे घातपाताचा संशय रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणी महाड पोलीस ठाण्यामध्ये रेल्वे कर्मचारी दीपक मोरे यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महाडचे पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.

Related posts: