|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मिरजेत मोहरमनिमित्त पंजेभेटींना प्रारंभ

मिरजेत मोहरमनिमित्त पंजेभेटींना प्रारंभ 

प्रतिनिधी/ मिरज

मुस्लीम बांधवाच्या मोहरम सणाला प्रारंभ झाला असून, मंगळवारपासून मिरासाहेब दर्गा आणि बाराइमाम दर्गा यांच्या पीरांच्या भेटी सुरू झाल्या. या भेटी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी पहाटे शेवटची भेट आणि त्यानंतर सरबत गाडय़ांची मिरवणूक होणार आहे.

प्रेषीत महंमद यांचे नातू हसन-हुसेन हे करबला येथे युध्दामध्ये मारले गेले. या युध्दात त्यांना अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. त्यांच्या हौतात्म्याच्या स्मृतीप्रित्यर्थ्य मुस्लीम बांधव मोहरम महिना साजरा करतात. हसन-हुसेन यांच्या स्मृती जागविण्यासाठी पंजाची स्थापना करण्यात येते. हौतात्म्याच्या दुःखद प्रसंगामुळे संपूर्ण महिनाभर मुस्लीम बांधव कोणतेही शुभकार्य करीत नाहीत.

मिरज शहरात बहामनी काळापासून मोहरम सण साजरा होतो. अदिलशाही काळात या मोहरमला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. शहरात मिरासाहेब दर्गा आणि बारा इमाम दर्गा या दोन दर्ग्यामध्ये पंजाची स्थापना करण्यात येते. शहरातील विविध ठिकाणीही पंजे स्थापन होतात. मोहरमच्या सातव्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत मिरासाहेब दर्ग्यातील पंजे आणि बाराइमाम दर्ग्यातील पंजे यांच्या भेटी-परतभेटी होतात. या पाहण्यासाठी पंचक्रोशीतून शेकडो हिंदू-मुस्लीम बांधव येतात. दहाव्या दिवशी ताबूत विसर्जन आणि सरबत गाडय़ांची मोठी मिरवणूक असते.

यंदा मंगळवारी 18 सप्टेंबरपासून मोहरमला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सायंकाळी मिरासाहेब दर्ग्यात पंजे स्थापन करण्यात आले. त्यानंतर शनिवारी बारा इमाम दर्ग्यातील पंजाची स्थापना करण्यात आली. शहरातही 50 हून अधिक ठिकाणी पंजाची स्थापना करण्यात आली आहे. मंगळवारपासून मिरासाहेब दर्ग्यातील पीर आणि बाराईमाम दर्ग्यातील पीर यांच्या भेटी-परतभेटी सुरू झाल्या. मंगळवारी सायंकाळी बारा इमाम दर्ग्यात पहिली भेट झाली. बुधवारी सायंकाळी दुसरी भेट मिरासाहेब दर्ग्यात होणार आहे. तिसरी भेट गुरूवारी 20 सप्टेंबर रोजी पहाटे मिरासाहेब दर्ग्यात होणार आहे. या दिवशी खत्तल रात्र, आलावा  होणार आहे. शुक्रवारी 21 सप्टेंबर रोजी पहाटे बारा इमाम दर्ग्यात चौथी व शेवटची भेट होणार आहे. दुपारी शहरातील विविध मंडळांच्या सरबत गाडय़ांची मिरवणूक मार्केटपासून सुरू होणार आहे. सायंकाळी ताबूत विसर्जन होणार आहेत.