|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दयानंद आर्य हायस्कूलचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष

दयानंद आर्य हायस्कूलचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष 

प्रतिनिधी/ तिसवाडी

नेवरा येथील गोमन्तक मराठी शिक्षण परिषदेच्या श्री दयानंद आर्य हायस्कूलचा सुवर्ण महोत्सव डिसेंबर 18 ते एप्रिल 19 याकाळात विविधरंगी कार्यक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सिध्दार्थ कुंकळकर यांनी नेवरा येथे घेण्यात आलेल्या कोर समितीच्या बैठकीत दिली.

श्री दयानंद आर्य हायस्कूलच्या कान्फरेन्स हॉलमध्ये संस्थेचे अध्यक्ष कुंकळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष विठू नार्वेकर, सचिव शशिकांत सावंत, नेवरा सरपंचा उषा नाईक, मुख्याद्यापक माधव खारवी आदिची उपस्थिती होती.

सुरूवातीला श्री. सावंत यांनी या बैठकी मागील हेतु स्पष्ट केला व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या समिती सदस्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष श्री. कुंकळकर म्हणाले की, या हायस्कूलने यशस्वीरित्या 50 वर्षे पूर्ण केली आहे. ही आम्हां सर्वांना अभिमान वाटण्याजोगे गोष्ट असून हा सुवर्ण महोत्सव दिमाखात साजरा करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी या बैठकीत केले.  सुवर्ण महोत्सवाची रूपरेखा अंतिम टप्प्यात असून दि. 1 डिसेंबर 18 रोजी संध्याकाळी शाळेच्या इमारतीचे, सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन व शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन अतिमहनीय मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप सोहळात एप्रिल 19 मध्ये दिमाखात साजरा होणार आहे. या बैठकीला राजेश नाईक, व्येंकटेश नाईक, कमलाकांत नाईक, चित्रकार किशोर नाईक, शेखर नाईक आदि मान्यवर उपस्थित असतील.

नियोजित कार्यक्रमानुसार सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, स्मरणीका प्रकाशन, सत्कार सोहळा, स्वच्छता अभियान, योग शिबीर आदिंचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक जाणकार सदस्यांवर कार्यक्रमाची जबाबदारी सोपविली आहे.