|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » माय डियर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका…

माय डियर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका… 

एकशे पंचवीस वर्षांनंतरही स्वामी विवेकानंद यांच्या भाषणातील शब्द न् शब्द सत्यघोष करत आहे. एकशे पंचवीस वर्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वामींच्या तेजस्वी विचारांचा जयघोष करतानाच त्यांचे आचरणही करुया. परिक्रमेच्या दरम्यान 27 ऑक्टोबर 1893 रोजी स्वामीजी गोव्यात मडगावात पोहोचले होते.

मानवजन्माचे अंतिम ध्येय व त्याला अनुषंगून कर्तव्य कसे पार पाडावे आणि हिंदू धर्माचे माहात्म्य आपल्या तेजस्वी विचारांद्वारे अवघ्या विश्वाला दाखवून देणारे स्वामी विवेकानंद यांनी जो ‘विश्व दिग्विजय’ केला त्याच्या शुभारंभाला 11 सप्टेंबर 2018 रोजी एकशे पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. 11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामींनी अमेरिकेतील शिकागो शहरात अखिल विश्व सर्वधर्म संमेलनातून ‘माय डियर सिस्टर्स अँड ब्रदर्स…’ या महान उद्बोधनातून जग जिंकले होते. अशाप्रकारचे उद्बोधन त्यापूर्वी जगाने कधी ऐकले नव्हते. आपल्या अवतीभवतीच्या माणसांना बंधू, भगिनी मानण्याची परंपरा केवळ भारतातच होती, ती स्वामीजींनी जगाला दाखवून दिली. स्वामींनी आपल्या ओजस्वी वाणीतून तेजस्वी विचाराद्वारे जगातील लोकांना धार्मिक, आध्यात्मिक तसेच मानव कल्याणकारी प्रकाशवाट दाखविली. माणसाचा जन्म हा किडय़ामकोडय़ांप्रमाणे नसून तो स्वकल्याणातून विश्वकल्याणासाठी आहे हे ठासून सांगितले. तुम्ही अमृताचे पुत्र आहात, सुर्यासारखे स्वयंतेजाने तळपत रहा. झोपून राहू नका. उठा, आता जागे व्हा. जोपर्यंत ध्येयप्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका, असा दिव्य संदेश दिला. अशा या महामानवाच्या पदस्पर्शाने गोवा पुनीत झाला असून त्यांच्या तेजस्वी विचारांचे अमृतही गोव्याला प्राप्त झाले आहे.

 विवेकानंदांचा गोव्याशी भावबंध

विवेकानंदांनी जी ‘भारत परिक्रमा’ केली त्यातून साऱया हिंदुस्थानच्या पुनरुत्थानाची बीजे रोवली गेली. परिक्रमेच्या दरम्यान 27 ऑक्टोबर 1893 रोजी ते गोव्यात मडगावात पोहोचले होते. मडगावातील धर्मगुरु सुब्रमण्यतीर्थ म्हणजे सुब्राय नायक यांच्याकडे त्यांचा निवास होता. स्वामींच्या भाषणांनी गोवा प्रभावित झाला होता. पणजीतील श्री महालक्ष्मी, म्हार्दोळातील श्री म्हाळसा व कवळेतील श्री शांतादुर्गेचे दर्शन घेऊन तेथे भजनेही सादर केल्याची माहिती इतिहासात सापडते. वर्षभरापूर्वी त्यांना कळले होते की अमेरिकेत सर्वधर्म संमेलन भरणार आहे. त्यात जर आपल्याला बोलण्याची संधी मिळाली तर हिंदू धर्म महात्म्य, सर्व धर्मांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आणि वसुधैव कुटुंबकम् ही उदात्त संकल्पना जगाला सांगण्याचा सुवर्णयोग ठरेल. पण त्यासाठी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करणे आवश्यक होते. तो कुठे होणार? ग्रंथ कुठे उपलब्ध होणार असे प्रश्न होते. परिक्रमेत पोरबंदर संस्थानचे दिवाण पंडित शंकर पांडुरंगराव यांनी स्वामींना सांगितले होते ‘ख्रिश्चन धर्माच्या अध्ययनासाठी स्वामीजी आपणास गोमंतकात जावे लागेल’. सुब्रमण्यतीर्थांच्या मदतीने राशोल येथील ख्रिस्ती सेमिनारीत ख्रिस्ती धर्माचा अभ्यास केला. पुढे याच तुलनात्मक अभ्यासाच्या जोरावर त्यांनी पश्चिम दिग्विजय केला.

‘द इंडियन किंग इज इन अवर टाऊन’ अशा हेडलाईन्सद्वारे अमेरिकेतील वृत्तपत्रांनी स्वामींचे जोरदार स्वागत केले होते. विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 च्या ऐतिहासिक भाषणाची सुरुवात माय डियर सिस्टर्स अँड ब्रदर्स… अशी केली होती. काही लोक ‘माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स’ असे स्वामींनी म्हटले होते म्हणून सांगतात ते चुकीचे आहे. संपूर्ण भाषण असे आहे…

माय डियर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आपण सर्वांनी आमचं अगत्यानं स्वागत केलं. शब्द सूचत नाही. ह्रदय अवर्णनीय आनंदानं भरुन आलंय. जगातील सर्वांत प्राचीन अशा संन्यासी धर्मातर्फे आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर सर्व वर्णांच्या, सर्व संप्रदायांच्या कोटी कोटी हिंदू नरनारींच्यावतीनं आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. आम्हाला अशा धर्माचा अभिमान वाटतो ज्या धर्मानं अखिल विश्वाला सहिष्णुता, सहजीवनाची, विश्वबंधुत्त्वाची शिकवण दिली. आम्हाला आमच्या राष्ट्राचा अभिमान वाटतो कारण त्यानं जगाच्या कानाकोपऱयातून आलेल्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं आहे. हिंदुस्थानातील लक्षावधी नरनारी ज्या स्तोत्राचं प्रतिदिन पारायण करतात ते आम्ही बालपणापासून करत आलोय…

रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटील नानापथजुषाम्

नृणाम एको गम्य त्वमसि पयसाम् अर्णव इव

भिन्न भिन्न उगमातून निघणारे सारे जलप्रवाह अंती सागरालाच मिळतात, त्याचप्रमाणे रुचिवैचित्र्यानुसार भिन्न भिन्न मार्गाने जाणारे सारे पांथिक अंती प्रभूलाच मिळतात. असे दिव्य शिक्षण देतो आमचा सत्य सनातन हिंदू धर्म. परंतु आज धर्माधर्मात जे वितंडवाद माजले आहेत, ते आम्हाला विनाशाकडेच घेऊन जाणार हे लक्षात ठेवा. विहिरीत राहणारी कूपमंडूक बेडकं झालोय आपण सारे, त्यामुळे समुद्र काय असतो ते कसं कळणार? ख्रिश्चनधर्मीय तसेच मुसलमान धर्मीय स्वतःच्या विहिरीत बसून तिलाच जग समजतात. त्यातून निर्माण होते संकुचित धर्मभावना. त्यातून जन्म घेते धर्मांधता. या वसुंधरेवर दीर्घकाल हाहाकार माजविला तो या धर्मांधतेनं. अगणित वेळा रक्ताचा सडा शिंपडला. राष्ट्राच्या राष्ट्रं उद्ध्वस्त झाली. क्रूर धर्मवेडे नसते तर आज मानवसमाज किती प्रगत झाला असता? पण आता त्यांची घटका भरलीय. या सर्वधर्म परिषदेच्या शुभारंभी झालेला घंटानांद म्हणजे मृत्यूघंटाच आहे या धर्मवेडय़ांची.

हिंदू ऋषिमुनींनी सत्याचे प्रयोग करुन वेद, उपनिषदांमधून आमचा सत्य सनातन हिंदू धर्म सांगितला. या पवित्र कार्यात स्त्रियांचेही मोठे योगदान आहे. स्त्राr ही आदिशक्ती… सृजनी… सृष्टी आणि संस्कृती. असा हा अथांग… विशाल महासागर म्हणजे हिंदूधर्म. सर्व धर्मियांना आपल्यामध्ये सामावून घेणारे आम्ही हिंदुस्थानी. आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक दिव्य संदेश…

शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा… आ रे धामानि दिव्यानि तस्थु…

हे अमृताच्या पुत्रांनो, हे दिव्यधामवासी देवानो, तुम्ही सर्वजण श्रवण करा. होय अमृताचे पुत्र आहात तुम्ही. बंधुनो, सिंहस्वरुप असूनही तुम्ही असे स्वतःला मेषतुल्य का समजता? उठा, आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका.

हिंदू धर्मग्रंथांचे वाचन केलंय त्यांनी कृपया हात वर करावेत. एवढय़ा सहा हजारांच्या उपस्थितीत केवळ पाच हात? आणि तरीही तुम्ही हिंदू धर्माचं मूल्यमापन करता? बंधुनो, तुमच्यासारख्या प्रगतशील अमेरिकन बंधुनो हे शोभत नाही. आमचा हिंदू धर्म म्हणजे प्रेम, माया, सहजीवन, त्याग व समर्पण आहे. हिंदूंनी कधी कुणावरही आक्रमण केलं नाही आणि तुम्ही हिंदुस्थानात धर्मप्रचारक पाठविणारे कोण? गरीबांना मदत करण्यापेक्षा साऱया हिंदुस्थानावर चर्च बांधण्यात तुम्ही गुंतले आहात. हिंदुंना गळय़ात क्रॉस घालायला भाग पाडता? आम्ही आजच 11 सप्टेंबर 1893 रोजी तुम्हाला बजावून ठेवतो… एक ना एक दिवस हा धार्मिक दहशतवाद तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या गुणांचा मक्ता कुण्या एका विशिष्ट धर्माकडं नाही. तरीही संघर्ष करत रहाल तर स्पष्ट शब्दांत आम्ही बजावतो… धर्माधर्मांच्या ध्वजांवर लवकरच लिहिलं जाईल… संघर्ष नको… परस्पर सहकार्य हवे! विनाश नको… कलह नको… मैत्री हवी! शांती हवी! आम्ही आवाहन करतो, आमच्यासारखं वसुधैव कुटुंबकम् माना. उठा, जागे व्हा आमचा संदेश स्वीकारा!’’

आज एकशे पंचवीस वर्षांनंतरही स्वामीच्या या भाषणातील शब्द न शब्द सत्यघोष करत आहे. एकशे पंचवीस वर्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वामींच्या तेजस्वी विचारांचा जयघोष करतानाच त्यांचे आचरणही करुया.

राजू भिकारो नाईक