|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वृंदावनातील गोपेश्वर महादेव

वृंदावनातील गोपेश्वर महादेव 

भगवान श्रीकृष्णांनी गोपी वेशातील महादेवांना पकडले, त्यांचा चेहऱयावरचा पदर वर सरकवला आणि म्हटले-या! गोपेश्वर या! आपला जयजयकार असो! बोला, गोपेश्वर महादेव की जय! शंकर भगवान की जय! राधा आणि इतर गोपी महादेवांच्या या गोपीरूपाला पाहून आश्चर्य करू लागल्या. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले- राधे! ही कोणी गोपी नाही आहे.  हे तर साक्षात् भगवान शंकर आहेत. आमच्या महारासाचे दर्शन व्हावे म्हणून यांनी हे गोपीरूप धारण केले आहे.

राधा कृष्ण युगलाने महादेवांना विचारले-पण महाराज, आपण हा गोपीवेश का धारण केलात? त्यावर भगवान महादेव म्हणाले, प्रभो! आपल्या या अनुपम महारासांत प्रवेश मिळावा म्हणून मला गोपीरूप धारण करावे लागले. यावर राधेने प्रसन्न होऊन महादेवांना वर मागायला सांगितले. त्यावर महादेव म्हणाले-आमचे मागणे आहे की आपल्या दोघांच्या चरणकमलांपाशी आमचा नेहमी वास व्हावा. आम्ही आपले दोघांचे चरणकमल सोडून दूर कोठेही जाऊ इच्छित नाही. राधाकृष्ण म्हणाले-तथास्तू! तेव्हापासून भगवान शिव गोपेश्वर रूपात तेथे राहू लागले. आजही वृंदावनात गोपेश्वर महादेवाचे मंदिर पहायला मिळते, जेथे दररोज सायंकाळी महादेवाची गोपी वेशात पूजा केली जाते. यानंतर भगवंतांनी महारास क्रीडा केली, त्याचे वर्णन प्रत्यक्ष सरस्वतीलाही करता येत नाही. सगळीकडे आनंदी आनंद झाला. नामदेवराय म्हणतात-  होता प्रात:काळ सांगतसे तया ।  जावें येथोनियां शीघ्र आतां ।। क्षणोक्षणा पाहाती देवाजीचें मुख। येती सकळीक गोकुळासी ।। परिक्षिती ऐके ऐका कौतुकासी । होत्या त्यांजपाशीं त्याच्या स्त्रिया ।। म्हणोनियां कोणी नाहीं विचारिलें । अंतरिं न कळे दुजियाला ।। यथामती रास वर्णिला देवाचा । संपूर्ण हे वाचा काय करी ।। चरित्र श्रवण करील जो कोणी। धन्य तोचि प्राणी नामा म्हणे ।। पहाट होताच श्रीकृष्ण गोपिकांना म्हणाले-तुम्ही त्वरेने आपापल्या घरी जा. घरी जात असताना क्षणाक्षणाला मागे वळून त्या कृष्णाचे मुख न्याहाळत होत्या. अशाप्रकारे त्या सर्वजणी गोकुळात येऊन पोचल्या. महामुनी शुकदेवांनी परीक्षितीला एक चमत्कार सांगितला तो असा की, गोप स्त्रिया वनात रासक्रीडेला आल्या होत्या, तरी त्यांच्या नवऱयांची अशी समजूत होती की, त्या आपल्या जवळच आहेत. म्हणून पतींनी त्यांना काहीच विचारले नाही. कारण त्यांच्या मनाला काहीच जाणवले नाही.  कोणताही संशय त्यांच्या मनात आला नाही. नामदेवराय म्हणतात-श्रीकृष्णाची ही रासलीला माझ्या कुवतीनुसार वर्णिली आहे. तिचे संपूर्ण वर्णन करणे हे माझ्या वाणीला शक्मय नाही. शुकदेवांनी वारंवार बजावले आहे की रासलीलेत श्रीकृष्णाचे रमण गोपींच्या शरीरांशी नव्हते. त्यांची पंचभौतिक शरीरे तर आपापल्या घरीच होती. इथे तर परमात्म्याशी गोपींच्या आधिदैविक आध्यात्मिक स्वरूपाचे मीलन आहे. शरीर कोठे का असेना, मीलन तर मनाशीच व्हायचे आहे.

Ad. देवदत्त परुळेकर