|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दत्ता नाईक यांची माटोळी ठरली आकर्षक केंद्रबिंदू

दत्ता नाईक यांची माटोळी ठरली आकर्षक केंद्रबिंदू 

वार्ताहर/ म्हार्दोळ

  दैनंदिन वापरातील फळे, औषधी वनस्पती, भाज्या, रानफळे अशा तब्बल साडेतीनशे वस्तूंचे संकलन करून गावठण-प्रियोळ येथील कृष्णनाथ नाईक यांच्या घरी दत्ता शंभू नाईक यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कलात्मक व आकर्षक अशी माटोळी साकारली आहे.

नाईक कुटुंबिय मागील दहा वर्षे अशा प्रकारची कलात्मक माटोळी तयार करीत आहेत. कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या दत्ता नाईक व कुटुंबियांनी साकारलेली माटोळी आकर्षणाचा केंदबिंदू बनली आहे.

तब्बल साडेतीनशेहून अधिक विविध फळे, वनस्पती व इतर दुर्मिळ वस्तूंचा वापर करून कलात्मकरित्या सजावट केलेल्या माटोळीच्या माध्यमातून त्यांनी गणपतीची प्रतिकृती साकारली आहे. ही माटोळी गणेश चतुर्थीचे आकर्षण व कौतुकास पात्र ठरली आहे.

माटोळीत मक्याचा वापर सुरेखरित्या करून त्यांनी ही कलाकृती तयार केली आहे. मक्याबरोबरच नाचणे, कांगुळ वरी, बाजरी, जायफळ, कांगाला, माट्टा, रुद्राक्ष, धूप, गोरख चिंच, मुचकुंद, मास रोहिणी, पुत्रजीवा, हनुमान फळ, पांढरे व सफेद गुंजी, मोहगणी, गमफळ, समुद्रफळ, नागकेशर, आले, लवाकेशर, सासवा, काळी भिरण, आंबा, कवठी चाफा फळ अशा विविध वस्तुंचे संकलन या माटोळीमध्ये पाहायला मिळते. श्रावण महिनाभर ते जंगलात फिरुन सर्वेक्षण करतात व चतुर्थीच्या तीन दिवस आदी माटोळी बांधायला सुरुवात करतात. या वस्तू संकलनासाठी आजवर त्यांनी नेत्रावळी, हरमल, खोल-काणकोण, शिरदोण, मडगांव, पणजी हरमल, फोंडा तालुका, बार्देश तालुका, कुळे-मोले, बेतोडा, वाळपई, प्रियोळ भागातील जंगलात भटकंती केली. याकामी त्यांचे काका कृष्णनाथ नाईक, भाऊ संजय नाईक तसेच साईज, विराज, विनय, युवराज गावडे व इतर कुटुंबातील सदस्य हातभार लावतात.

एकाच छताखाली औषधी वनस्पती, कंदमुळे, रानफळे, मसाल्यांची झाडे, वेली आणि दैनंदिन वापरातील फळांची ओळख करुन देण्याची संधी मिळत असल्याने घेतलेल्या कष्टाचा आनंद व समाधान मिळत असल्याचे दत्ता नाईक यांनी सांगितले. तसेच दत्ता नाईक यांनी स्व. प्रदीप शिरोडकर यांच्या मार्गदर्शन घेऊन त्यांच्या कलेचा वारसा चालू ठेवण्यासाठी भाताच्या कणसापासून आकर्षक आरस तयार करण्यात आली आहे.