|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » गदिमांच्या स्मारकाबाबत शासन, पुणे महानगरपालिका उदासिन : आनंद, श्रीधर माडगुळकर यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

गदिमांच्या स्मारकाबाबत शासन, पुणे महानगरपालिका उदासिन : आनंद, श्रीधर माडगुळकर यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी 

पुणे / प्रतिनिधी :

  •  1 ऑक्टोबरपासून गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ

 

 महाराष्ट्राच्या सारस्वतातील अग्रणी असलेल्या ग.दि.माडगुळकरांचे जन्मशताब्दी वर्ष 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मात्र तरीही महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका गदिमांच्या स्मारकाबाबत उदासिन आहे. तसेच गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेने अद्याप कोणताही कार्यक्रम न आखल्याबाबत आश्चर्य व खंत माडगूळकर परिवाराने पुण्यात व्यक्त केली.

शासन व पुणे महानगरपालिकेच्या उदासिनतेबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना आनंद माडगुळकर व श्रीधर माडगुळकर म्हणाले की, गीतरामायणासारखी अजरामर रचना गदिमांनी पुण्याच्या ठिकाणी लिहिली. तसेच इतर अनेक साहित्य भांडार त्यांनी पुण्यात निर्माण केले. मात्र पुणे महानगरपालिकेला याचा विसर पडलेला आहे. मुक्ता टिळक यांच्यासारख्या सांस्कृतिक महापौर लाभूनही त्यांनी गदिमांच्या जन्मशताब्दीसाठी पुण्यात कोणत्याही कार्यक्रमाची आखणी अद्याप केली नसल्याबाबत आश्चर्य वाटते. 2008 साली महानगरपालिकेने गदिमांच्या स्मारकासाठी 5 कोटी मंजूर करून नदीकाठची जागा देऊ केली. मात्र ती जागा आता ग्रीन झोनमध्ये गेली आहे. त्यामुळे स्मारकासाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी गदिमा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे.

गदिमा, सुधीर फडके आणि पु.ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी शासनाने 5 कोटींचा निधी मंजूर केला. मात्र या निधीमध्ये केवळ साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच समावेश आहे. शासनाने जाहीर केलेल्या गदिमांच्या स्मारकाचे स्मरण अद्याप झालेले नाही. आता जन्मशताब्दी वर्षात तरी शासनाकडून गदिमांचे स्मारक पूर्णत्त्वाला जाईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान गदिमा प्रतिष्ठानतर्फे गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ ‘गदिमा प्रतिभा आणि प्रतिमा’ या विशेष कार्यक्रमाने पुण्यातून करण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी गदिमांच्या शंभराव्या जन्मदिनी सायंकाळी 5 वाजता टिळक स्मारक मंदिरात या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमात गदिमांची काव्यप्रतिभा प्रसिद्ध कवी अरूण म्हात्रे मांडणार आहेत. गदिमांच्या चित्रप्रतिभेबद्दल प्रसिद्ध चित्रपटलेखिका-अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी, तर गदिमांच्या साहित्य प्रतिभेबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी बोलणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर असणार आहेत.

या कार्यक्रमाच्या विश्रांतीनंतर प्रदिप दीक्षित दिग्दर्शित ‘गदिमा’ हा अनुबोधपट रसिकांना गदिमांच्या काळात घेऊन जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रेक्षागृहाचा तळमजला निमंत्रितांसाठी राखीव, तर बाल्कनीमध्ये मात्र विनामुल्य मुक्त प्रवेश असणार आहे. याचबरोबर कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात रात्री 9 वाजता स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या गदिमा गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मात्र प्रवेशमुल्य असणार आहे. गदिमांच्या स्मारकाबाबत शासन व पुणे महानगरपालिकेने वेळीच विचार केला नाही. अशाचप्रकारे उदासिन राहिल्यास माडगुळकर परिवाराने जीवापाड जपलेल्या गदिमांच्या पंचवटी येथील घराला नाईलाजास्तव पाडावे लागेल. गदिमांच्या आठवणींनी जपलेली वास्तू पाडण्याचा कटू निर्णय घेऊन त्याठिकाणी स्मारक इमारत उभी करावी लागेल, अशी भिती श्रीधर माडगुळकर यांनी व्यक्त केली.