|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » भरधाव ट्रकची ऑटोला धडक

भरधाव ट्रकची ऑटोला धडक 

ऑनलाईन टीम / नागपूर :

जिह्यातील कळमेश्वर – सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ऑटोतील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतात तीन लहान मुले, एक महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

मोहरम निमित्त नागपुरातील ताजबाग परिसरातील काही भाविक वरोडा शिवारातील चाँदशाह दर्ग्याकडे ऑटोने जात होते. कळमेश्वर-सावनेर मार्गाववर वरोडा शिवारातील पोल्ट्री फार्मजवळ सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱया या भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पाचही मृतकांचे मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी सध्या तणावाचे वातावरण आहे. काहींच्या मते मृतक हे नागपुरातील राहणारे आहेत. तर काहींच्या मते ते हैदराबाद येथील रहिवासी असल्याचे जखमींपैकी एकाने सांगितले. नागपुरातील नातेवाईकाकडे ते पाहुणे म्हणून आले होते.