|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मोदींच्या वाराणसी प्रकल्पाला कोकणी प्रतिभेचा ‘टच’

मोदींच्या वाराणसी प्रकल्पाला कोकणी प्रतिभेचा ‘टच’ 

तिर्थक्षेत्रासह घाटाला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी नितीन देसाईंकडे

दापोलीच्या शिरपेचात खोवला गेला आणखी एक मानाचा तुरा

मनोज पवार /दापोली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतदार संघातील वाराणसीला तब्बल 550 कोटी रूपयांचे ‘गिफ्ट’ नुकतेच जाहीर केले आहे. यातून वाराणसी या तिर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होणार आहे. तसेच वाराणसीला लाभलेल्या 12 किलोमीटरच्या घाटालाही गतवैभव प्राप्त होणार आहे. हे ऐतिहासिक व महत्वपूर्ण काम दापोलीचे सुपूत्र व जागतिक किर्तीचे सिनेकला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडे सोपवण्यात आल्याने दापोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यानिमित्ताने मोदी यांच्या स्वप्नातील वाराणसीला देसाई यांच्या रूपाने मात्र कोकणी टॅलेंटचा टच लाभणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त नितीन देसाई दापोलीतील पाचवली येथे आपल्या घरी आले असता त्यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना या बाबत माहिती दिली. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या होमपिचवर जोरदार बॅटींग करत वाराणसीला 550 कोटी रूपयांचे पॅकेज मंगळवारी जाहीर केले आहे. 4 वर्षांच्या आधी वाराणसी हे शहर ‘भोले’ यांच्या भरवशावर होते. मागील चार वर्षांत वाराणसी मतदार संघाचा आपण चेहरामोहरा बदलला असल्याचा दावादेखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. वाराणसी शहराला प्राचीन इतिहास आहे. वाराणसीची परंपरा व जुन्या वारशाचे जतन आपल्याला करायचे आहे, असेदेखील मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. सध्या वाराणसी येथे येणाऱया पर्यटकांना, भाविकांना वाराणसी शहराचा इतिहास माहिती करून देण्याचा, पर्यटकांना वाराणसीच्या प्रेमात पाडण्यासाठी वाराणसीच्या घाटांचे पुनरूज्जीवन करण्याचा मोदी यांनी चंग बांधला आहे. यासाठी त्यांना यातील तज्ञ व्यक्तींची गरज होती.

नितीन देसाई यांनी नरेंद्र मोदींसाठी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे काही वर्षांपूर्वी झालेल्या सभेत कमळातून व्यासपीठावर स्थानापन्न करण्याचा प्रयोग केला होता. हा प्रयोग कमालीचा ‘हिट’ झाला. यानंतर नितीन देसाई यांनी मोदींसोबत तब्बल 82 प्रकल्प केले. यामुळे साहजिकच वाराणसीची जबाबदारीही नितीन देसाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यात वाराणसीच्या 12 कि.मी.च्या घाटाचे पुनरूज्जीवन करणे व घाटाला त्यांचे ऐतिहासिक महत्व पुन्हा प्राप्त करून देणे आदी कामांचा समावेश आहे.

शिवस्मारक कामातही देसाई

मुंबईसमोरील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱया शिवस्मारकाच्या कामातही देसाई यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. शिवस्मारकाच्या आतील भागात शिवाजी महाराजांचा पराक्रम व इतिहास जिवंतपणे उभा करण्याची जबाबदारी नितीन देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवस्मारकाच्या जलपूजनासाठी मुंबईत आले असता देसाई यांनी त्यांच्यासोबत समुद्रात जावून त्यांना भविष्यात शिवस्मारक कसे असेल, या बाबत सविस्तर माहिती दिली होती.

‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चा ऑक्टोबरमध्ये शुभारंभ

देशाचे पहिले गृहमंत्री आणि संस्थांनांच्या विलिनीकरणात महत्वाची भूमिका पार पडून देश एकसंघपणे बांधणाऱया सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरात येथे उभ्या राहिलेल्या 182 मिटर पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण पुढील महिन्यात होत आहे. ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया या पुतळय़ाच्या अनावरण सोहळय़ाला देश-विदेशातील पाहुणे व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासाठी हा कार्यक्रमही भव्यदिव्य करण्याचा मोदी यांचा मानस आहे. यासाठी त्यांनी ही जबाबदारी पुन्हा नितीन देसाई यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

Related posts: