|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » क्रिडा » विराट कोहली, मिराबाईला ‘खेलरत्न’

विराट कोहली, मिराबाईला ‘खेलरत्न’ 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मिराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, महाराष्ट्राची स्टार नेमबाज राही सरनोबत व सांगलीची क्रिकेटपटू स्मृती मानधनाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी या पुरस्कारासाठी क्रीडा खात्याने या खेळाडूंची शिफारस केली होती. यानंतर, गुरुवारी विविध क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती भवनात 25 सप्टेंबर रोजी होणाऱया विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. विशेष म्हणजे, विराट कोहली हा सचिन तेंडुलकर व महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केला जाणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. सचिनला 1997 मध्ये तर धोनीला 2007 मध्ये या पुरस्काराने गौरवले गेले होते.

क्रीडा मंत्रालयाने विराट कोहली व मिराबाई चानू यांची खेलरत्नसाठी शिफारस केली होती. गुरुवारी या देशातील सर्वोच्च पुरस्कारावर विराट व मिराबाईला हा पुरस्कार मिळाल्याचे घोषित करण्यात आले. तसेच कोल्हापूरचे महान कुस्तीपटू दादु चौगुले यांना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आयसीसी मानांकन यादीत विराट कोहली जागतिक स्तरावर कसोटीत अव्वलस्थानी विराजमान असून मागील सलग तीन वर्षात तो सातत्याने दमदार प्रदर्शन साकारत आला आहे. 2016 व 2017 मध्ये तो शर्यतीत होता. पण, त्या दोन्ही वेळा विराटची संधी हुकली होती. 29 वर्षीय विराट कोहलीच्या खात्यावर सध्या 71 कसोटीत 23 शतकांसह 6147 धावा तर 211 वनडेत 35 शतकांसह 9779 धावा नोंद आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्रित 58 शतकांसह सर्वाधिक शतके झळकावणाऱया फलंदाजांच्या यादीत तो सचिन तेंडुलकरपाठोपाठ (100 शतके) दुसऱया स्थानी देखील आहे. बीसीसीआय मागील 3 वर्षांपासून विराट कोहलीची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करत आले आहे. पण, या तीन वर्षात साक्षी मलिक, पीव्ही सिंधू व दीपा करमाकर यांना रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्वोच्च यशासाठी गौरवले गेले आणि विराट या प्रत्येक वेळी सन्मानापासून वंचित राहिला होता. यंदा मात्र इंग्लंडविरुद्ध मालिकावीर पुरस्कार मिळवत आपली दावेदारी भक्कम केली होती. गुरुवारी अखेरीस त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Related posts: