|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडा

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडा 

प्रतिनिधी /बेळगाव :

यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक रविवार दि. 23 रोजी काढण्यात येणार आहे. आजपर्यंत बेळगावात ही मिरवणूक शांततेत पार पडली आहे. यावर्षीही ती शांततेत पार पाडावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कोणतीही अडचण आल्यास पोलीस आयुक्तांशी संपर्क साधावा. बेळगावचे नाव बदनाम होऊ नये यासाठी प्रत्येक मंडळांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी केले.

 जिल्हाधिकाऱयांनी गुरुवारी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि शांतता समितीच्या पदाधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी  समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱयांना सूचना केल्या. गणेश विसर्जन मिरवणूक काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी हेस्कॉमने दक्षता घ्यावी. कपिलेश्वर तलाव परिसरात तातडीने तयारी पूर्ण करण्याची सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना दिली. मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

ग्रामीण भागातून विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकवर्ग मोठय़ा संख्येने येत असतो. त्यांच्यासाठी रात्री उशिरापर्यंत बसची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने वेळेत आपली श्रीमूर्ती मिरवणुकीत  दाखल करावी. एकापाठोपाठ एक गणेश मंडळांनी मिरवणुकीतून पुढे सरकावे. कोणीही वेळकाढूपणा करू नये, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. मिरवणूक काळात रात्री रुग्णवाहिकांची सोय करावी, असेही आरोग्य खात्याला सांगण्यात आले.

Related posts: