|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » इब्रामपूर येथे आज स्वर सुधा कार्यक्रम

इब्रामपूर येथे आज स्वर सुधा कार्यक्रम 

प्रतिनिधी /पणजी :

इब्रामपूर येथील श्री सातेरी देवी व पंचायतन देवतांच्या अखंड भजनी सप्ताहीतील तीसरा पार आज दि. 21 रोजी होणार असून त्यानिमित्त स्वर सुधा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पांडुरंग प्रसादीक मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील चव्हाठा मंडपात रात्री 9.30 वा. हा कार्यक्रम होणार असून नंतर चव्हाठा मंडप ते सातेरी देवीच्या मंदीरा पर्यंत चित्ररथ मिरवणूक होणार आहे.

सात दिवस चालणाऱया अखंड भजनी सप्ताहात गेले दोन दिवस राज्यातील तसेच राज्याबाहेरील नामवंत गायकांच्या मैफली चांगल्याच रंगल्या आहेत. त्याला रसिक प्रक्षेकांनीही भरभरून दाद दिली आहे. भजनी सप्ताहातील पहिल्या पार त्वष्टा ब्राम्हण कासार समाजातर्फे आयोजित करण्यात आला होता. त्यात मुंबईतील अभिषेक तेलंग व सांगलीतील श्रध्दा जोशी यांनी उत्कृष्ट गायन सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. गजर, नाटय़गीत तसेच एकापेक्षा एक अशा सरस गवळणी त्यांनी सादर केल्या होत्या. त्यांना तबल्यावर रोहीदास परब, संवादीनीवर सुभाष फातार्पेकर, पखवाजवर विशांत सुर्लकर व मंजीरीवर गौतम परब यांनी चांगल्यापैकी साथ केली होती. नंतर डिचोली येथील शांतादुर्गा महिला दिंडी पथकाने दिंडी सादर करीत चव्हाठा ते सातेरी मंडीरापर्यंत चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली.

काल गुरुवार दि. 20 रोजी विठोबा रखूमाई मंडळातर्फे भजनी सप्ताहातील दुसरा पार साजरा करण्यात आला आहे. यावेळी गोमंतकीय कलाकार दशरथ नाईक व सिध्दी सुर्लकर (पिळगावकर) यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. त्यांना संवादीनीवर प्रसाद गावस, तबला शैलेश शिरोडकर, पखवाज प्रतिक देसाई यांनी सुरेख साथ केली आहे.

शनिवार दिनांक 22 रोजी दुपारी 12 वाजता भजनी सप्ताहाची सांगता होणार आहे. सकाळी श्रींची पालखीतून मिरवणूक होणार असून नंतर दहीकाला होणार आहे. दुपारी आरती प्रसादाने सात दिवस चालणाऱया अखंड भजनी सप्ताहाचा सांगता होणार आहे.