|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कालव्यांची दैनावस्था दूर करा

कालव्यांची दैनावस्था दूर करा 

घोटगेवाडीतील शेतकऱयांचे अधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी / दोडामार्ग:

तिलारी प्रकल्पाच्या घोटगेवाडीमधून गेलेल्या उजव्या कालव्याची झालेली विदारक स्थिती सुधारण्याबरोबरच प्रत्येक शेतकऱयाच्या शेतात पाणी पोहोचविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी घोटगेवाडीतील शेतकऱयांनी कोनाळकट्टा येथील तिलारी
प्रकल्पाच्या कालवा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी त्यांनी उपसरपंच भालचंद्र कुडव यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंत्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

तिलारी प्रकल्पाचा उजवा कालवा घोटगेवाडीतून गेला आहे. या ठिकाणी आठ कि. मी. अंतरापर्यंत कालव्याच्या कामावर वर्षभरापूर्वी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला. मात्र, तरीही कालव्याची अवस्था विदारक बनली आहे. या मुख्य कालव्याला जोडून बांधण्यात आलेल्या मायनर कालव्याची दुरुस्ती करावी, कालव्यांना कायमस्वरुपी पाणी सुरू ठेवावे, संपूर्ण कालव्याची साफसफाई करावी. तसेच साफसफाईचे घोटगेवाडी गावच्या कार्यक्षेत्रातील काम गावकऱयांनाच मिळावे. प्रत्येक शेतकऱयाच्या शेतात पाणी पोहोचावे, आदी मागण्यांसाठी शुक्रवारी कोनाळकट्टा येथील तिलारी प्रकल्पाच्या कालवा विभागाच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी उपसरपंच भालचंद्र कुडव, गुरुदास दळवी, प्रकाश कवठणकर, उमेश वाडकर, महेश सावंत, आशिष मेस्त्राr, सत्यम सावंत, रोहन दळवी, कमलेश पर्येकर, गौरव दळवी, प्रशांत सातार्डेकर, संतोष दळवी, रघुनाथ पनवेलकर आदी शेतकरी उपस्थित होते.

अधिकारी चर्चा करणार

पोटकालव्याच्या कामाची दुरुस्ती करणे, कालव्याची साफसफाई करणे, प्रत्येक शेतकऱयाच्या जमिनीत पाणी पोहोचविण्याबाबत उपाययोजना करणे आदी कामे 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवणे, कालव्यावरील हरिजनवाडी ते कुंभारवाडी रस्ता डांबरीकरण करणे, साफसफाईचे काम गावकऱयांनाच दिले जावे, आदी मागण्या धोरणात्मक असल्याने त्याबाबतचा निर्णय कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या स्तरावर घेण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱयांना देण्यात आले. तसेच कालवा विभागाचे वरिष्ठ अधिकारी मंगळवार 25 सप्टेंबरला कोनाळकट्टा येथील कार्यालयात येऊन शेतकऱयांशी चर्चा करतील, अशी ग्वाहीदेखील सहाय्यक अभियंता अभिषेककुमार शुक्ला यांनी दिली.

Related posts: