|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्ग उपसभापतीपदी धनश्री गवस

दोडामार्ग उपसभापतीपदी धनश्री गवस 

भाजपचा पराभव : शिवसेनेच्या सभापतींचे भाजपला मत

प्रतिनिधी / दोडामार्ग:

पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सेनेच्या धनश्री गणेशप्रसाद गवस विजयी झाल्या. त्यांनी भाजपचे उमेदवार लक्ष्मण नाईक यांचा चार विरुद्ध दोन मतांनी पराभव केला. निवडीवेळी सेनेचे विद्यमान सभापती गणपत नाईक यांनी सेनेला मतदान न करता भाजपला मतदान केले. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची साथ मिळाल्याने सेनेच्या सौ. गवस विजयी झाल्या.

सुनंदा धर्णे यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांनी काम पाहिले. सभागृहात सेनेचे संख्याबळ सर्वात जास्त म्हणजेच तीन असल्याने आणि सभापती निवडीवेळी ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी साथ दिल्यास सेनेचाच उपसभापती बसेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, प्रत्यक्षात सेनेच्या विद्यमान सभापतीनाच आपल्या गळाला लावण्याची किमया भाजपने साधली. मात्र, तरिही भाजप विजयी झाला नाही.

भाजपच्या उमेदवाराला दोनच मते

उपसभापतीपदासाठी सेनेकडून धनश्री गवस यांनी, तर भाजपकडून लक्ष्मण नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हात उंचावून मतदान घेण्यात आले. सभापती गणपत नाईक, सेनेचे तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी, धनश्री गवस, काँग्रेसच्या संजना कोरगावकर, राष्ट्रवादीच्या सुनंदा धर्णे, भाजपच्या पंचायत समिती सदस्य लक्ष्मण नाईक उपस्थित होते. यावेळी प्रत्यक्ष मतदानाप्रसंगी सभापती गणपत नाईक यांनी सेनेच्या धनश्री गवस यांना मतदान न करता भाजपचे उमेदवार लक्ष्मण नाईक यांनी मतदान केले. त्यामुळे नाईक यांना त्यांचे स्वत:चे मत धरून एकूण दोन मते मिळाली, तर सेनेच्या धनश्री गवस यांना त्यांचे स्वत:चे मत व इतर तीन सदस्यांची मते मिळून एकूण चार मते मिळाल्याने त्या उपसभापती म्हणून विजयी झाल्या. त्यांचे गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

बाबुराव धुरी

सभापतींवर कारवाई करणार

उपसभापती निवडीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्यावतीने एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ही पंचायत समिती तिन्ही पक्षांची मिळून असल्याचे जाहीर केले. सभापती निवडीवेळी सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी असा फॉर्म्युला ठरला होता. त्या फॉर्म्युल्याप्रमाणेच उपसभापतीपदाची निवड झाली, असे सांगण्यात आले. सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी सभापती गणपत नाईक यांच्यावर सेनेच्या उमेदवारास मतदान न केल्याने कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबी बोर्डेकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमानंद देसाई उपस्थित होते.

गणपत नाईक

मी शिवसेनेचाच-सभापती नाईक

पंचायत समितीचे सभापती गणपत नाईक यांनी भाजपला मतदान केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना सदस्यांचा गट असून त्याची नोंदणी जिल्हाधिकाऱयांकडे झाल्याने गटनेते लक्ष्मण नाईक यांनी व्हील बजावला. त्याप्रमाणेच आपण भाजपच्या उमेदवारास मतदान केले, असे सांगितले.