|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जुगारप्रकरणी नऊजण निर्दोष

जुगारप्रकरणी नऊजण निर्दोष 

जप्त केलेले 41 हजार परत करण्याचेही आदेश

प्रतिनिधी / कणकवली:

कणकवली बाजारपेठ-डीपीरोड जवळील जागेत रात्री विनापरवाना तीनपत्ती जुगार खेळताना छापा टाकून अटक करण्यात आलेल्या नऊजणांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. जमादार यांनी निर्दोष मुक्तता केली. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेली सुमारे 41 हजार रुपयांची रक्कमही परत करण्याचे आदेश देण्यात आले. आरोपींच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

14 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8.45 च्या सुमारास डीपीरोडलगत मोकळय़ा जागेत जुगार सुरू असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. साळुंखे यांनी त्यांच्या स्टाफसह छापा टाकला असता, प्रशांत बिडये, दिगंबर गवंडळकर, अनिल हर्णे, हरेश निखार्गे, महेश नार्वेकर, संदीप चव्हाण, गौरव गवाणकर, सचिन मोरे, दिनेश वराडकर यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत 40 हजार 890 रुपये एवढी रोख रक्कम मिळून आली होती. खटल्याच्या चौकशीत चार साक्षीदार तपासण्यात आले होते. सुनावणीअंती कारवाईबाबत कोणताही ठोस पुरावा आढळून न आल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करतानाच जप्त केलेली रक्कमही परत करण्याचे आदेश दिले.