|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » समिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय

समिहनने स्वीकारला ‘होम स्कूल’चा पर्याय 

पारंपरिक शिक्षण पद्धतीला फाटा : वैज्ञानिक होण्याची मनीषा

तेजस देसाई / दोडामार्ग:

ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झालेली शिक्षण पद्धती म्हणजे निव्वळ घोकंपट्टी व टॅलेंटच्या नावाखाली विद्यार्थ्यांची गळचेपी असल्याचे अलिकडच्या काळात जाणवू लागले आहे. याच शिक्षण पद्धतीला फाटा देऊन ‘गुरुकुल’च्या धर्तीवर ‘होम स्कूल’ संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या मुलाला शाळेत न पाठवताही उत्तम विद्यार्थी बनविण्याचा निर्णय भेडशी येथील भूषण पांगम यांनी घेतला आहे. तशी त्यांनी आपल्या मुलाची वाटचाल सुरू केली आहे.

पेशाने कॉम्प्युटर इंजिनिअर व भेडशीत स्वत:चे कॉम्प्युटर सेंटर चालविणाऱया भूषण पांगम यांचा समिहन हा दहावर्षीय मुलगा. सुरुवातीला गोव्यात पहिली ते तिसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या समिहनची शिक्षणाच्या दृष्टीने आताची वाटचाल पारंपरिक शिक्षण पद्धतीला फाटा देणारी आहे. ब्रिटिशांच्या काळापासूनच्या घोकंपट्टीत या शिक्षणाचा विद्यार्थ्याला म्हणावा तसा उपयोग होत नाही. यासाठी पूर्वीच्या काळातील ‘गुरुकुल’ शिक्षण पद्धतीचा पुरस्कार समिहनचे आई-वडील करतात. पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्याच्या अंगात जे कौशल्य आहे, ते विकसित करून त्याद्वारे विद्यार्थ्याने आपल्या जीवनात यशस्वी व्हावे. या टॅलेंटच्या आधारावरच मुलांना शिक्षण दिल्यास त्याचा खरा उपयोग या विद्यार्थ्यांना होऊ शकेल, असे पांगम सांगतात.

‘ओपन स्कूल’मध्ये टॅलेंटला वाव

गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेली शिक्षण पद्धती बदलून त्यात विद्यार्थ्यांच्या क्षेत्रातील टॅलेंटच्या अनुषंगाने अभ्यासक्रम निर्माण केल्यास ‘स्किल’ला खऱया अर्थाने वाव मिळतो. त्यासाठी ‘होम स्कूल’, ‘ओपन स्कूल’च्या माध्यमातून आपण समिहनचा अभ्यास करून घेत असल्याचे पांगम यांनी सांगितले. समिहनला गणित व विज्ञान विषयाची आवड असून ‘होम स्कूल’च्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्थांशी संपर्क साधून आवश्यक माहिती/ज्ञान मिळू शकते. सध्याच्या काळातील शिक्षण पद्धतीमुळे अनावश्यक स्पर्धा वाढली असून टक्केवारीच्या नादात कमी गुण मिळालेला विद्यार्थी जर आत्महत्येसारखा पर्याय निवडत असेल तर असल्या शिक्षणाची गरजच काय? टॅलेंटच्या आधारावर देण्यात येणारे शिक्षण घेऊन जर एखाद्या चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते तर मग सरकारी नोकरी मिळावी, या अट्टाहासापायी अनेक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धेला का जुंपावे, असा सवाल पांगम विचारतात.

‘होम स्कूल’ला वाढता पाठिंबा

प्रत्येक मूल, विद्यार्थी हा हुशारच असतो. फक्त त्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यातून त्याचा उत्कर्ष साधता आला पाहिजे, हे पटलेल्या जवळपास एक ते दीड लाखांचा एक गट तयार झाला आहे. एकमेकांच्या संपर्क ओळखीतून हा गट गुरुकुलसारख्या पुरातन शिक्षण पद्धतीचा वापर या काळात कसा करता येईल व विद्यार्थ्यांचा विकास कसे घडेल, याबाबत विविध उपक्रम, संकल्पना राबवित असल्याचेही पांगम यांनी स्पष्ट केले.

शालेय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

‘होम स्कूल’च्या माध्यमातून शिकल्यावर शालेय प्रमाणपत्र नोकरीसाठी कशी मिळणार, असा सवाल कला असता पांगम म्हणाले, आज प्रमाणपत्रापेक्षा टॅलेंटला महत्व आहे. शिवाय मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पाचवी, आठवी व दहावी आणि त्यानंतर ऑनलाईन परीक्षा देता येतात. ती प्रमाणपत्रे ग्राहय़ धरली जातात. तशी सुविधा केंद्र पातळीवर आहे.

वैज्ञानिक बनविण्याच्या दृष्टीने वाटचाल

आपला मुलगा समिहन हा सध्या दहावीच्या काठिण्य पातळीवरील अभ्यासक्रम सहज सोडवितो. त्याला गणित व विज्ञान विषयात रुची आहे. संगणकात तर तो पारंगत आहे. तो वैज्ञानिक होईल, अपेक्षा पांगम यांनी व्यक्त केली.

मुक्त शिक्षण…आनंदी वातावरण!

विद्यार्थी शाळेत गेल्यावर विविध तासिका ऐकत असतो. घरी आल्यावर ‘होमवर्क’ मध्ये गुंतला जातो. त्यामुळे त्याला त्याचे छंद जोपासणे अवघड बनते. मात्र, ‘होमस्कूल’च्या माध्यमातून शिकत असताना वाटेल तेव्हा विविध छंदांना वेळ देऊ शकतो. आज नको. इथे नको…तिथे नको, अशी कारणेही बंद होतात. त्यामुळे विद्यार्थीही आनंदी राहतो.

Related posts: