|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अवेळी मोहोरातून कैऱयाही लगडल्या!

अवेळी मोहोरातून कैऱयाही लगडल्या! 

वातावरणातील बदलाचा आंब्यावर परिणाम

दिड महिना अगोदरच आंब्याला मोहोर

प्रतिनिधी /रत्नागिरी

पावसाने मारलेली दडी, रात्री थंडी तर दिवसा ‘ऑक्टोबर हिट’ प्रमाणे चटके अशा बदलत्या वातावणारचा परिणाम आंब्यावरही झाला आहे. यंदा दीड महिना आधीच ठिकठिकाणी आंब्याला मोहोर येऊ लागला असून त्या मोहोराचे आता छोटय़ा कैऱयातही रूपांतर होताना दिसत आहे.

चैत्र महिन्यात पानगळ होऊन आंब्याला नवी पालवी फुटते. पाऊस थांबला की झाडाची पालवी पक्व होऊन मोहोर येण्यास किमान दीड महिन्याचा कालावधी लागतो. आंब्याच्या फुटव्यात काडी तयार होऊन ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस अनेकदा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहोर येतो. दरवर्षी कडाक्याच्या थंडीनंतर आंबा झाडांना मोहोर येतो, मात्र यंदा वेगळेच चित्र दिसू लागले आहे.

अनेकदा सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पाऊस असल्याने आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया रखडते किंवा लांबते. पावसामुळे तसेच थंडी उशिरा पडल्याने मोहोर येण्याची प्रक्रिया लांबते. पण यंदा ऑगस्टच्या अखेरीस पावसाने दडी मारली. बदलत्या वातावरणामुळे हवेतील उष्मा वाढला आहे. रात्री थंडी तर दिवसा उन्हाचा तडाखा जाणवत आहे.

या वातावरणात अनेक ठिकाणी आंब्याला मोहोर आला आहे. मात्र वातावरणातील या बदलामुळे आलेला हा मोहोर टिकून राहणार का? हा प्रश्न आहे. मात्र अनेक ठिकाणी त्या मोहोराला कैऱयाही धरल्याचे दिसून येत आहे. मात्र या कैऱयांचे आंब्यात रूपांतर होणार की त्यांची गळ होते याकडे लक्ष लागले आहे.

 

Related posts: