|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » अजिंक्य रहाणे, अय्यरची शतके

अजिंक्य रहाणे, अय्यरची शतके 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

विजय हजारे करंडक स्पर्धेत बलाढय़ मुंबईने आपला विजयी झंझावत कायम राखताना कर्नाटकवर 88 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा हा सलग दुसरा ठरला आहे. प्रारंभी, कर्णधार अजिंक्य रहाणे (148) व श्रेयस अय्यर (110) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 50 षटकांत 5 बाद 362 धावा केल्या. प्रत्युतरातदाखल खेळताना कर्नाटकचा डाव 45 षटकांत 274 धावांवर आटोपला.

प्रथम फलंदाजी करणाऱया मुंबईची सुरुवात दणक्यात झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ व कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी 18 षटकांत 106 धावांची सलामी दिली. मात्र, फटकेबाजीच्या प्रयत्नात पृथ्वी 60 धावांवर बाद झाला. त्याच्या खेळीत 8 चौकार व 1 षटकाराचा समावेश राहिला. यानंतर, रहाणेने श्रेयस अय्यरसोबत दुसऱया गडय़ासाठी 216 धावांची भागीदारी करताना संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. दरम्यान, रहाणेने शानदार शतकी खेळी साकारताना 150 चेंडूत 13 चौकार व 3 षटकारासह 148 धावांचे योगदान दिले. श्रेयस अय्यरने त्याला चांगली साथ देताना 82 चेंडूत 5 चौकार व 8 षटकारासह 110 धावा फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर शिवम दुबेने नाबाद 23 धावा करत संघाला 362 धावापर्यंत मजल मारुन दिली. कर्नाटकतर्फे विनय कुमार, अभिमन्यु मिथुन, स्टुअर्ट बिन्नी व गौतम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

मुंबईने विजयासाठी दिलेले 363 धावांचे आव्हान कर्नाटकला पेलवले नाही. त्यांचा डाव 45 षटकांत 274 धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर मयंक अगरवालने सर्वाधिक 48 चेंडूत 66 धावा फटकावल्या. मयंक वगळता इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केल्याने कर्नाटकला 88 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार विनय कुमार (36), करुण नायर (31), के. गौतम (38), आर. समर्थ (20) या स्टार फलंदाजांना करिष्मा दाखवता आला नाही. मुंबईतर्फे शाम्स मुलाणीने 71 धावांत 4 गडी बाद करत विजयात मोलाची भूमिका बजावली. तुषार देशपांडे व शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या विजयासह मुंबईला चार गुण मिळाले आहेत.

संक्षिप्त धावफलक : मुंबई 50 षटकांत 5 बाद 362 (पृथ्वी शॉ 60, अजिंक्य रहाणे 148, श्रेयस अय्यर 110, शिवम दुबे नाबाद 23, विनय कुमार 1/76, मिथुन 1/81, गौतम 1/40).

कर्नाटक 45 षटकांत सर्वबाद 274 (मयंक अगरवाल 66, करुण नायर 31, विनय कुमार 36, गौतम 38, मुलाणी 4/71, तुषार देशपांडे 2/68, शिवम दुबे 2/48).

 

अन्य सामन्यांचे निकाल –

  1. गोवा 5/317 वि वि रेल्वे सर्वबाद 275
  2. पंजाब 7/278 वि वि विदर्भ सर्वबाद 137
  3. छत्तीसगड 6/252 वि वि उ. प्रदेश सर्वबाद 250
  4. हैदराबाद 205 वि दिल्ली 4/178 (दिल्ली विजयी)
  5. तामिळनाडू 315/4 वि वि सेनादल सर्वबाद 232.

 

Related posts: