|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिराळा नाथफाटा येथे अपघात भासवून खून

शिराळा नाथफाटा येथे अपघात भासवून खून 

प्रतिनिधी/ शिराळा

शिराळा नाथफाटा येथे अपघात भासवून खून करण्यात आला असल्याचा उलघडा झाला आहे. ही घटना अनैतिक संबंधाच्या संशयातून घडली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. शिराळा पोलिसांच्याकडून या खुनाच्या घटनेचा उलघडा अवघ्या तीनच दिवसात करण्यात आला असून सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळाले आहेत.

शिराळा नाथफाटा येथील तोरणा ओढय़ाच्या पुलावरुन मोटारसायकल खाली पडून अपघात घडला असल्याची घटना रविवार, 16 रोजी रात्री ते सोमवार, ा17 रोजी पहाटेदरम्यान घडली आहे.  या अपघातात जांभळेवाडी ता. शिराळा येथील युवक शिवाजी मधुकर जाधव (वय 30) हा जागीच ठार झाला होता. परंतु शवविच्छेदनातून काहीसा वेगळाचा प्रकार असल्याचे शिराळा पोलिसांच्या नजरेस आले होते. त्यानतंर शिराळा पोलिसांकडून तपासाची सूत्रे फिरविण्यात आली. या घटनेच्या तपासाअंती शिराळा नाथफाटा येथे घडलेला मोटारसायकल अपघात हा अपघात नसून खून केला गेला असल्याचे समोर आले आहे.

संबंधीत घटनेची शिराळा पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, या प्रकरणाची फिर्याद शकंर सदाशिव जाधव यांच्याकडून पोलिसांत देण्यात आली. यानतंर तपासाला वेग आला. मयत शिवाजी जाधव याचे गावातीलच एका म†िहलेशी अनैतिक संबंध होते असा संशय होता. यावरुन हा खुनाचा प्रकार घडला असल्याचे प्रथमदर्शनी संशयितांकडून पोलिसांना उलघडा झाला आहे. या खुनाच्या घटनेतील संशयित असे संबंधीत महिलेचा पती महादेव रामचंद्र सपकाळ वय 36 राहणार जांभळेवाडी ता. शिराळा हा मुख्य अरोपी आहे. गौसुलआझम उर्फ नाना सलीम दिवान वय 26 रा. कापरी फाटा ता. शिराळा, अभिजित आनंदा कांबळे रा. इंग्रूळ ता. शिराळा, रोहित संजय गायकवाड वय 22 रा. सुजयनगर शिराळा, गणेश बाजीराव यादव वय 21 रा. इंग्रूळ ता. शिराळा या चौघांना महादेव सपकाळ यांच्याकडून मयत शिवाजी जाधव याला मारण्याची सुपारी चार लाख रुपयांना देण्यात आली होती.

महादेव सपकाळ याच्याकडून शिवाजीच्या खुनाची सुपारी सात ते आठ महिन्यापूर्वी गौसुलआझम सलीम दिवान व अभिजित आनंदा कांबळे या दोघांना देण्यात आली होती. दोघांनी शिवाजी जाधव याचा काटा काढण्यासाठी सहा महिन्यापूर्वी प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न त्यांचा फसला होता. त्यानंतर त्यांनी आता रविवारी रात्री पुन्हा खुनाचा प्रयत्न केला. यावेळी त्या दोघांनी रोहित संजय गायकवाड व योगेश बाजीराव जाधव या दोघांना या खुनात सहभागी करुन घेतले होते.

यातील पाचवा आरोपी गणेश जाधव याच्या ओळखीचा मयत शिवाजी जाधव होता. या दोघांचे एकमेकांशी चांगले संबंध असल्याने गणेशच्या माध्यमातून शिवाजी जाधवला जेवणासाठी बाहेर नेण्यात आले. अभिजित कांबळे याच्या शिराळा येथील खोली वरती जेवणाचा बेत आखण्यात आला होता. यावेळी गौसुलआझम व मयत शिवाजी भरपूर दारु प्यायले. शिवाजी जाधव याची शुध्द हरपेपर्यंत शिवाजीला दारु पाजण्यात आली. त्यानतंर खोलीवरतीच शिवाजीच्या तोंडावरती उशी ठेवून बेशुध्द पाडण्यात आले. शिवाजी जाधव पूर्णपणे बेशुध्द झाल्याची खात्री पटल्यानतंर अभिजित, रोहित रात्रीच्या वेळी शिवाजीला मोटारसायकल वरुन घेऊन शिराळा नाथफाटा तोरणा ओढा पुलावरती घेऊन गेले.

त्यांच्या पाटीमागूण पाळतीवरती गौसुलआझम व गणेश यादव हे दोघेही गेले. शिवाजी जाधवला पुलावरुन खाली टाकून देण्यात आले. अपघात भासवण्यासाठी मोटरसायकल रेस करुन पुलावरुन खाली सोडण्यात आली. तसेच मयत शिवाजी जाधव याच्या तोंडावर मोठा दगड घालण्यात आला.

दुसऱया दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. परंतु हा अपघात असल्याचेच सर्वांच्या समोर आले. मयत शिवाजी जाधव याच्या शवविच्छेदनातून हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यादिशेने शिराळा पोलिसांच्या कडून तपासाची सूत्रे हालविण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शिवाजी जाधव याच्या मोबाईल फोन तपासला असता व त्यावरती कॉलचे डिटेल्स घेतले. त्यामधील एक फोन बंद आवस्थेत सापडून आला. पोलिसांनी या मोबाईलचा कसून तपास केला असता हा मोबाईल या आरोपींच्या पैकी एकाचा असल्याचे समजून आले. त्यानंतर तपासाची चक्रे जोमात फिरविण्यात आली.

संशयित आरोपी गौसआझम दिवान व अभिजित कांबळे यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सगळी हकीगत शिराळा पोलिसांच्या पुढे मांडली. यातूनच हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानतंर सर्व आरोपींना पकडून अटक करण्यात आली आहे. या तपास यंत्रणेत सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे पाटील, पोलीस अमोल शिंदे, प्रकाश पवार, रणजित कौलगे, संजय माने, अरुण काकडे सहभागी झाले.

मोबाईल डिटेल्स…

 मयत शिवाजी जाधव याच्या मोबाईल वरील डिटेल्स तपासला असता त्यामध्ये एक फोन सतत बंद आवस्थेत सापडून आला. त्याच फोनच्या दिशेने तपास यंत्रणा राबविली असता खुनाचा प्रकार कोणाकडून व कसा झाला याचा उलगडा झाला