|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सर्पदंशाने बालकाचा मृत्यू

सर्पदंशाने बालकाचा मृत्यू 

प्रतिनिधी/ सांगली

वर्षानुवर्षे स्वच्छता नसल्याने उगवलेली झाडी, घाणीचे साम्राज्य, घरांच्या पडक्या भिंती, खिडक्या मोडलेल्या, शौचालयांचीही तीच अवस्था असणाऱया विश्रामबाग एमएसईबी आवारातील कर्मचारी निवासस्थानांमध्ये शुक्रवारी पहाटे एका सात  वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सिव्हिल डिपार्टमेंटच्या निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळेच मुलाला सर्पदंशामुळे जीव गमवावा लागल्याचा आरोप करत संतप्त कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी निदर्शने केली. कार्यालयाला टाळे ठोकले. सिव्हिल विभागाच्या अधिकाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

 निवासस्थानांच्या दुरूस्तीसाठी आलेल्या निधीतून अधिकाऱयांसाठीचा बॅडमिंटन हॉल सुसज्ज करण्यात आल्याचा आरोप करत संतप्त कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांनी बॅडमिंटन हॉलचा दगडफेक करून चक्काचूर केला. केदार किरण चव्हाण (वय 7 वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. मृत केदारचे वडील हे नॉर्थ झोन डिव्हिजनमध्ये वरिष्ठ
तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मुळचे पन्हाळा येथील चव्हाण कुटुंबीय नोकरीच्या निमित्ताने सांगलीतच राहण्यास आले आहे. एमएसईबी कॉलनीत पत्नी आणि एकुलता एक मुलगा केदार असे ते राहात होते. केदार हा विश्रामबाग परिसरातीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. शुक्रवारी पहाटे तीन  वाजण्याच्या सुमारास अंथरूणातच केदारला सर्पाने दंश केला.

 वडील किरण यांनी त्याला तातडीने वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले. पण, केदारला वाचवण्यात यश आले नाही. सर्पदंशाने केदारचा मृत्यू झाल्याचे समजताच कॉलनीतील कामगारांच्या कुटुंबीयासह सर्वच कामगार आणि अधिकारी संतप्त झाले. महिलांनी जोरदार निदर्शने केली. 2013 पासून या कॉलनीची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. निवासस्थानांची डागडुजी सोडाच पण काटेरी झुडपेही काढण्यात आलेली नाहीत. अनेक वेळा कामगार संघटनांनी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याच्या संतप्त भावना व्यक्त करत आंदोलने करण्यात आली. नातेवाईकांनीही मृत केदारचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

 महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय साळे यांनी कर्मचारी आणि कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, संतप्त महिला ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या. जोपर्यंत अधीक्षक अभियंता समोर येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेण्यात आला. पण, पोलीस आणि काही अधिकारी, कामगारांनी समजूत काढून मृतदेह चव्हाण यांच्या मूळ पन्हाळा या गावी पाठवण्यात आला. वीज कर्मचारी कृती समिती आणि कर्मचारी संघटना प्रतिनिधींची बैठक झाली.

स्वच्छता ठेकेदार काळय़ा यादीत

 यावेळी झालेल्या बैठकीत स्वच्छता ठेकेदाराला काळय़ा यादीत टाकण्याचा निर्णय झाला. तर एक महिन्यात कॉलनीतील सर्व अंतर्गत सुविधा पुरवण्यात येतील, दर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात अधिकारी, ठेकेदारा आणि रहिवासी यांची बैठक होईल असा निर्णय झाला. यावेळी सिव्हिल विभागाचे मुख्य अभियंता जहागिरदार, कार्यकारी अभियंता साळवी, महावितरणचे अधीक्षक अभियंता साळे, शिरीष काटकर, संघटना प्रतिनिधी पी. एस. पाटील, महेश ज्योतराव, पृथ्वीराज शिंदे, एल. आर. दळवी, सर्जेराव गायकवाड उपस्थित होते.