|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगावात ‘स्वाईन फ्लू’मुळे महिलेचा मृत्यू

मडगावात ‘स्वाईन फ्लू’मुळे महिलेचा मृत्यू 

प्रतिनिधी/ मडगाव

मडगावात ‘स्वाईन फ्लू’मुळे एका महिलेला मृत्यू येण्याची घटना घडली असून त्यामुळे या विषाणूची धास्ती पुन्हा एकदा पसरली आहे. ‘स्वाईन फ्लू’ला टाळण्याच्या दृष्टीने लोकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झालेल्या एका महिलेला मडगावातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच तिला मृत्यू आला. या प्रकाराने भीती पसरली असून लोकांनी सतर्क राहून उपाय घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. मध्यंतरी ‘स्वाईन फ्लू’चा बऱयाच प्रमाणात प्रसार होऊन गोव्यातही बळी नोंदले गेले होते. मात्र हल्ली या विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले होते. अशा परिस्थिती ही घटना घडल्याने लोकांना धक्का बसला आहे.

प्रतिबंधात्मक उपायांची गरज

‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाल्यानंतर ताप येणे, सर्दी होणे, डोके दुखायला लागणे, नाक वाहू लागणे, खोकू लागणे अशी लक्षणे दिसायला लागतात. सहसा श्वासोच्छवासाबरोबरच थुंकीतूनही या रोगाचे विषाणू पसरत असतात. त्यामुळे लोकांनी सावध राहून प्रतिबंधात्मक उपाय घ्यायला हवेत. रक्ततपासणी करून घेतानाच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. विषाणूची बाधा झाल्यानंतर प्राथमिक स्तरावर आवश्यक उपचार घेतल्यास या रोगास बळी पडण्यापासून सहज वाचता येते, अशी माहिती मडगावातील डॉ. व्यंकटेश हेगडे यांनी दिली. लोकांनी खबरदारीचे उपाय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.