|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव 

प्रस्तावावर काँग्रेसच्या 15 आमदारांच्या सहय़ा

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील आघाडी सरकारचा तिढा आज सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष दिल्लीकडे लागून राहिले आहे. दरम्यान, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आणखी तीन आठवडय़ांनी ते गोव्यात परतणार आहेत. अमेरिकेत उपचार घेत असलेले मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी गरज पडल्यास आपण विधानसभेत येऊन मतदान करु शकतो, असे कळविल्याने पर्रीकर सरकारचा जीव भांडय़ात पडला आहे. दुसऱया बाजूने काँग्रेसने आणखी एक पाऊल पुढे टाकून सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरुद्ध अविश्वासाची नोटीस दिली आहे. या नोटीसीला कोणतीही कायदेशीर मान्यता मिळत नाही.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी भाजपने अद्याप निर्णय घेतलेला नाही. आज शनिवारी सायंकाळपर्यंत त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम असतील, केवळ उपमुख्यमंत्रीपद द्यावयाचे की विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर यांचे द्विसदस्यीय पॅनल स्थापन करुन मंत्र्यांना अतिरिक्त खातेवाटप करायचे याबाबत निर्णय जाहीर करणे शिल्लक राहिले आहे.

आता सभापतींविरुद्ध अविश्वासाची नोटीस

काँग्रेसचा नवा ‘प्रताप’

दरम्यान, काँग्रेसच्या 15 आमदारांच्या स्वाक्षरीद्वारे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी विधानसभा सचिवांकडे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. येत्या 14 दिवसांत यावर निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. गेले आठ दिवस काँग्रेसने सातत्याने पर्रीकर सरकारला सर्व बाजूनी कोंडीत पकडण्यासाठी पावले उचलली आहेत. राजभवनवर दोनवेळा जाऊन सरकारला हटवा किंवा सरकारला विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडण्यास भाग पाडा, त्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही केली.

काँग्रेसचा प्रस्ताव राज्यपाल फेटाळणार

राज्यपाल मृदुला सिन्हा आज शनिवारी काँग्रेसची मागणी फेटाळून लावण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत आघाडी सरकारातील एकही घटक पक्ष सरकारातून बाहेर पडलेला नसल्यामुळे अल्पमतात आहे असे म्हणता येणार नाही. या एकाच मुद्यांतर्गत काँग्रेसचा प्रस्ताव राज्यपाल फेटाळतील. मंत्री आजारी आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु त्यामुळे सरकारचे बहुमत खाली उतरले हे तांत्रिकदृष्टय़ा पटणारे नाही हे निकष लावून विशेष अधिवेशनची काँग्रेसची मागणी राज्यपाल फेटाळून लावतील, असा अंदाज आहे.

अविश्वास प्रस्तावावर 15 आमदारांच्या सहय़ा

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या 15 आमदारांच्या स्वाक्षरी असलेला प्रस्ताव विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी विधिमंडळ सचिवांच्या कार्यालयात सादर केला. विधिमंडळ सचिव नीळकंठ सुभेदार हे थंडी तापाने आजारी असल्याने आपल्या कार्यालयात पोहोचले नाहीत, मात्र त्यांच्या सचिवाने हे पत्र स्वीकारले. काँग्रेसच्या या प्रस्तावाला सध्या कोणतीही किंमत राहत नाही. मागील अधिवेशनात जर हा प्रस्ताव आला असता तर सरकार अडचणीत आले असते, मात्र काँग्रेसने आता अधिवेशन नसताना हा प्रस्ताव सादर केलेला आहे. या प्रस्तावाचा कायदेशीर विचार करता हा प्रस्ताव सभापती डॉ. प्रमोद सावंत पुढील चार दिवसात कायदेशीर सल्ला घेऊन फेटाळू शकतात.

कायमस्वरुपी तोडगा काढावा : गावडे

विद्यमान स्थितीत कायमस्वरूपी तोडगा काढणेच योग्य होणार आहे. आपले वैयक्तिक मत हेच असल्याचे सरकारमधील कला आणि सांस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले आहे. सरकारमध्ये अनेक मंत्री आहेत जे चांगली कामगिरी करू शकतात. त्यामुळे काही खाती या मंत्र्यांकडे दिली जावी. जेणेकरून या खात्यांचे काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. गोमंतकीयाच्या हिताच्या दृष्टीने निर्णय होणे आवश्यक आहे. आपण भाजपबरोबरच आहे आणि शक्य तेवढा लवकर यावर तोडगा निघायला हवा असे आपल्याला वाटते असेही ते म्हणाले.

अविश्वास प्रस्तावाला कायदेशीर मान्यता नाही

विधानसभा अधिवेशन चालू असताना प्रस्ताव सादर केला तर सभापतींना तो त्वरित दाखल करुन चर्चेसाठीची तारीख मुक्रर करावी लागते. मात्र त्यासाठी देखील 14 दिवसांचा कार्यकाळ आवश्यक असतो किंवा अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यपालांनी अधिवेशन जाहीर केल्यानंतर प्रस्ताव सादर केला तर तो सभागृहाच्या कामकाजाचा एक भाग ठरतो. इथे तशी परिस्थिती नाही. त्याचबरोबर अविश्वास ठरावाची नोटीस पाठविताना अविश्वासाची कोणतीही कारणे काँग्रेसच्या नेत्यांनी विषद केलेली नाही. काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याने पुढाकार घेऊन आमदारांच्या स्वाक्षऱया घेतल्या आहेत. काँग्रेसचा हा ‘प्रताप’ पाहता याचा सरकारवर कोणताही परिणाम होऊ शकत नाही.

पांडुरंग मडकईकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

शुक्रवारी सायंकाळी आलेल्या माहितीनुसार, वीजमंत्री पांडुंरग मडकईकर यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली असून मुंबईच्या कोकिळाबेन इस्पितळात ते सध्या फिजिओथेरपी घेत आहेत. त्यांचा डावा पाय व डाव्या हातामध्ये पाहिजे तेवढे बळ आलेले नाही. ते व्यवस्थित बोलत आहेत आणि पूर्वी प्रमाणेच त्यांचे वागणे आहे. सर्व गोष्टी त्यांच्या स्मृतीत आहेत. भाजपचे सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी मंत्री मडकईकर यांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांच्याशी एक तास मनमुरादपणे गप्पागोष्टी केल्या. किंचित डाव्या पायामध्ये अडथळे आहेत. फिजिओथेरपीद्वारे दररोज सराव आणि व्यायाम केला जात आहे. राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलाविल्यास गरज पडेल तर आपण मतदानास येण्याची तयारीही मडकईकर यांनी व्यक्त केली अशी माहिती सदानंद तानावडे यांनी मुंबईहून दै. ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.