|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अस्नोडा जलप्रकल्पाच्या कंत्राटदार कंपनीकडून पंप दुरुस्तीस नकार

अस्नोडा जलप्रकल्पाच्या कंत्राटदार कंपनीकडून पंप दुरुस्तीस नकार 

प्रतिनिधी/ म्हापसा

संपूर्ण बार्देश तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱया अस्नोडा जलशुद्धिकरण प्रकल्पाचे कंत्राट दिल्ली येथील गॅनन डंकर्ले या कंपनीला देण्यात आले होते. हे कंत्राट सहा महिन्यापूर्वी संपले असून अद्याप सुमारे 80 लाख रु. सार्वजनिक बांधकाम खाते त्या कंपनीला देणे असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच कंत्राटही नुतनीकरण न झाल्याने या प्रकल्पाकडे सर्वांनीच पाठ फिरविल्याचे आढळून आले आहे. या प्रकल्पावर एकूण 10 वॉटरपंप आहेत पैकी तीन जळून निकामी झाले आहेत. कंपनीचे पैसे सरकारने अद्याप चुकते न केल्याने हे पंप दुरुस्त करण्यास त्या कंपनीने नकार दर्शविला आहे.

अस्नोडा जलशुद्धिकरण प्रकल्प सांभाळणाऱया कंपनीचे कंत्राट सहा महिन्यापूर्वी संपूनही त्याचे अद्याप नुतनीकरण झालेले नाही.

पंप दुरुस्त होऊन आज कसे येणार?

जेव्हा पहिला मोटरपंप जळाला त्यावेळी त्याची दुरुस्ती करणार कोण हा प्रश्न उदभवला. अधिकाऱयांनी तो दुरुस्ती व देखभाल न करता तसाच ठेवल्याने काही दिवसांनी अन्य दोन्ही पंपवर दबाव येऊन तेही जळून निकामी झाले. एकूण तीन पंप नादुरुस्त झाले. पंप दुरुस्त करण्यासाठी गोव्यात तज्ञ व्यक्ती नसल्याने पंप बेंगलोर व अहमदाबादला पाठविण्यात आले आहेत. हे पंप शनिवारपर्यंत दुरुस्त करुन मिळणार असे सांगण्यत आले असले तरी ते अद्याप आलेले नाहीत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. अलिकडेच 20 एमएलडीचा अन्य एक पंप जळाला असता तो दुरुस्तीसाठी गोव्यातच वेर्णा येथे पाठवून दिला होता. तो दुरुस्त करुन आणला मात्र तो दुरुस्त झाला नसल्याने पुन्हा दुरुस्तीसाठी पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कंत्राटी कामगार सहा महिने पगाराविना

सार्वजनिक बांधकाम खात्याने साडेतीन कोटीच्या नवीन कंत्राटाची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या कंत्राटाच्या खर्चास मंजुरी देण्यासाठी फाईल वित्त खात्याकडे पाठविली आहे. दरम्यान, येथे कंत्राट पद्धतीने काम करणाऱया कामगारांना सहा महिने पगारही देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.

अद्याप तालुक्यात 40 एमएलडी पाण्याचा तुटवडा

दोन्ही प्रकल्पाद्वारे 7 पंपामार्फत हा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 30 एमएलडीमध्ये 2 पंप व 2 बॅकअप पंप तर 12 एमएलडीमध्ये दोन मुख्य पंच तर एक बॅकअप असे तीन पंप मिळून आता सातही पंप पाणी पुरवठा करण्यास सज्ज आहेत. गेल्या 11 सप्टेंबरपासून हा प्रकार सुरु आहे. हे सातही पंप नॉनस्टॉप सुरु असून यावर दबाव येऊन पुन्हा हे सर्व पंप जळण्याची शक्यता अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे. सध्या तालुक्याला 40 एमएलडी पाण्याचा तुटवडा भासत आहे.

सोमवारपर्यंत पंप पुन्हा बसविणार

अस्नोडा जलशुद्धिकरण प्रकल्पात अन्यत्र ठिकाणाहून एक पंप तात्पुरता आणला होता, मात्र त्यात बिघाड झाल्याने तो परत करण्यात आला. मुख्य प्रकल्पातील पंप दुरुस्तीसाठी अहमदाबादला पाठविण्यात आला होता पैकी एक रविवारी आणण्यात येणार आहे. पुन्हा बसविण्यात आल्यावर हा पंप सोमवार वा मंगळवारपर्यंत खुला होईल. बंगळूरहून दुसरे पंप दुरुस्त करुन आल्यावर येथे पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा पुन्हा एकदा सुरु होईल, अशी अशा तेथील अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.

अभियंत्याचे पद रिक्त

दरम्यान, या प्रकल्पाला डिचोलीहून वीज पुरवठा होतो मात्र अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण होतो. हे काम स्वतंत्ररित्या हाताळत असले तरी जोपर्यंत भूमिगत वीजवाहिन्या टाकल्या जात नाही तोपर्यंत ही समस्या कायमची राहाणार असल्याची माहिती देण्यात आली. सध्या याठिकाणी सिव्हील इंजिनियर म्हणून कनिष्ठ अभियंता राऊत काम पाहत आहे तर मॅकेनिकल अभियंता म्हणून पेडणेकर काम पाहत आहेत. अलिकडेच पेडणेकर यांना बढती देण्यात आली आहे. मात्र ऑर्डर देऊन त्यांची बदली करण्यात न आल्याने ते त्याच जागेवर आहेत. या ठिकाणी पाणी पुरवठा खात्याचे साहाय्यक अभियंता पद गेल्या 7 महिन्यांपासून रिक्त असल्याची माहिती देण्यात आली.