|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोत तीन कार्यालये फोडली साडेतीन लाखांची रोख लंपास

वास्कोत तीन कार्यालये फोडली साडेतीन लाखांची रोख लंपास 

प्रतिनिधी/वास्को

वास्को पोलीस स्थानकापासून अवघ्या शंभर मिटर अंतराच्या आत असलेल्या एका इमारतीतील तीन खासगी कार्यालये फोडून अज्ञात चोरटय़ांनी सुमारे दीड लाखांची रोख लंपास केली आहे. ही चोरी गुरूवारी रात्री किंवा शुक्रवारी पहाटेच्या वेळी झालेली असण्याची शक्यता आहे.

वास्को शहरातील स्वातंत्र्यपथ मार्गावरील एमपीटी इन्स्टिटय़ूटच्या समोर असलेल्या रोहन आर्केड या इमारतीमध्ये एकाच वेळी तीन कार्यालये फोडण्याची ही घटना घडली. अगदी मुख्य रस्त्यावर असलेल्या या इमारतीमध्ये खासगी कार्यालयेच असून ही कार्यालये गुरूवारी संध्याकाळी तसेच रात्री बंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी आपली कार्यालये उघडण्यासाठी आलेले असताना ही चोरी उघडकीस आली. एकाच वेळी तीन कार्यालये फोडण्यात आल्याने या कार्यालयांमधील कर्मचाऱयांना धक्क्काच बसला. त्यांनी त्वरित आपल्या मालकांना व पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे चोऱया झालेली ही इमारत वास्को पोलीस स्थानकापासून शंभर मिटर अंतराच्या आत आहे. मात्र, पोलिसांना या घटनेचा कोणताही सुगावा लागला नाही.

दरवाजाचे टाळे तोडून आत प्रवेश

चोरटय़ांनी प्रत्येक कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे टाळे तोडून आत प्रवेश करून कार्यालय अस्ताव्यस्त केले. परंतु सगळीकडे शोधाशोध करूनही हाती काही लागले. मात्र, कपाटे फोडून त्यांनी रोख रक्कम मिळवली. तिन्ही कार्यालयांतील मिळून सुमारे साडेतीन लाख रूपयांची रोख या चोरटय़ांनी पळवली आहे. नासेक कन्सलटन्सी, मरिन लिंक शिपिंग एजन्सी व चार्टड अकाऊटंन्ट हेगडे यांच्या कार्यालयांमध्ये ही चोरी झाली आहे.

पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून चौकशी प्रारंभ केला. ठसेतज्ञ व श्वान पाथकही घटनास्थळी हजर झाले. त्यांनी चोरांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फारसे यश आले नाही. पोलिसांनी अज्ञातांविरूध्द घरफोडीचा गुन्हा नोंद केला आहे. वास्को शहरात सध्या चोरांचा उपद्रव वाढलेला असून शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुकाने, कार्यालये व फ्लॅटांना लक्ष्य करून चोरटे पोलिसांना आव्हान देत आहेत.