|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘राजा निलगार’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर

‘राजा निलगार’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर 

प्रतिनिधी/ संकेश्वर

मोहरम सणाची सुटी असल्याने शुक्रवारी राजा निलगारच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणेश चतुर्थीपासून आतापर्यंत एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तसेच बेळगावहून आलेल्या दहा अंध मुला-मुलींनीही राजाचे दर्शन घेतले. आठवडी बाजारात भाविकांची झालेली गर्दी पाहता लोकवर्दळीचा महापूरच उसळल्याचे चित्र पहायला मिळत होते. तथापि ताबूत विसर्जनासाठी निघालेली मिरवणूक यामुळे पोलिसांची बंदोबस्तासाठी तारांबळ उडाली होती.

शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून बस, खासगी वाहने, वडाप या वाहनांनी शहरात दाखल होऊन भाविक दर्शनासाठी रांगेत उभे रहात होते. पोलीस स्थानकापासून आझाद रोड, गांधी चौक, लक्ष्मी पुलासह हेदुरशेट्टी यांच्या निवासस्थानापर्यंत भली मोठी रांग लागली होती. तसेच गडहिंग्लज नाक्यावरील खुल्या जागेत मोठय़ाप्रमाणात वाहने थांबली होती. सुदैवाने कडाक्याचे उन्ह नव्हते. ढगाळ हवामानामुळे भाविकांनी समाधानाने दर्शन घेतले. शहरातील युवक मंडळाच्या स्वयंसेवकांनी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी प्रत्येक भाविकाला तातडीचे दर्शन घेऊन माघारी पाठवित होते. तासागणिक वाढणाऱया लोकगर्दीने शहरातील सर्वच प्रमुख रहदारीची ठिकाणे फुलून गेली होती.

नगरसेविका हतनुरे यांनी केली पाण्याची सोय

दर्शनासाठी येणाऱया भाविकांना पिण्यासाठी पाण्याची सोय नव्हती. पाणी नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाल्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत नगरसेविका सीमा हतनुरे यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मी पूल, युनीयन बँक व गांधी चौक याठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून भाविकांची तहान भागविण्याचे काम केले. त्यांच्या या उपक्रमाचे भाविकांतून व नागरिकांतून कौतुक होत होते.

बेळगावच्या अंध मुलांचे राजाकडे साकडे

भल्या मोठय़ा गर्दीत बेळगावहून दहा अंध मुली व मुले दर्शनासाठी रांगेत उभा होते. स्वयंसेवकांनी त्यांची विचारपूस करून त्यांना तातडीने राजाचे दर्शन देण्याचे काम केले. नवसाचा राजा असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही दर्शनाला आलो आहोत. आमचेही म्हणणे राजाने ऐकावे हिच आमची भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याच एका मित्राने त्या दहा जणांना दर्शनासाठी आणले होते.

दर्शनासाठी नियोजित वेळ

राजाचे दर्शन घेण्यास येणाऱया भाविकांनी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शनासाठी यावे, असे आवाहन शिवपुत्र हेदुरशट्टी यांनी केले. भाविक अवेळी दर्शनासाठी येत असल्याने वारंवार दरवाजे उघडावे लागत आहेत. याचा त्रास होत असून सर्वांना एकाचवेळी दर्शन मिळावे यासाठी वरील वेळेचे नियोजन केले आहे. या नियोजनाची भाविकांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण

सुटीचा दिवस असल्याने पहाटेपासूनच मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत होते. तसेच आठवडी बाजार असल्याने खेडय़ातील विक्रेते व ग्राहकही शहरात दाखल होत होते. तथापि मोहरमनिमित्त ताबूत विसर्जन मिरवणूकही निघाली होती. त्यामुळे शहरातील सर्वच मार्गावर मोठी वर्दळ पहायला मिळत होती. तासागणिक वाढणारी संख्या पोलिसांना बंदोबस्तासाठी कसरत करावी लावणारी होती. शनिवार व रविवार या दोन दिवशी सुटी असल्याने दर्शनासाठी पुन्हा गर्दी होणार अशी चर्चा होती.