|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » ‘टायगर्स’विरुद्ध भारताची विजयी ‘डरकाळी’!

‘टायगर्स’विरुद्ध भारताची विजयी ‘डरकाळी’! 

आशिया चषक स्पर्धा : जडेजाचे 29 धावात 4 बळी, भुवनेश्वर-बुमराहचे 3 बळी, रोहितचे नाबाद अर्धशतक

वृत्तसंस्था / दुबई

डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा (4-29), भुवनेश्वर (3-32), बुमराह (3-37) यांची भेदक गोलंदाजी व रोहित शर्माच्या तडफदार अर्धशतकाच्या बळावर भारताने आशिया चषकातील पहिल्या सुपर-फोर लढतीत बांगलादेशविरुद्ध विजयाची डरकाळी फोडली. प्रारंभी, बांगलादेशचा डाव 49.1 षटकात सर्वबाद 173 धावांवरच गुंडाळल्यानंतर भारताने 36.3 षटकात 3 बाद 174 धावांसह सहज विजय संपादन केला. मुळातच कमी धावा झाल्याने बांगलादेशच्या गोलंदाजांना फारशी संधी नव्हती. त्यात अफगाणविरुद्ध एका दिवसापूर्वीच येथे पराभव स्वीकारला असल्याने येथे हा संघ फारसा बहरात दिसून आलाच नाही.

विजयासाठी 174 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान समोर असताना कर्णधार रोहित शर्माने मर्यादित षटकात आपणच हिरो का ठरतो, याचा आणखी एक उत्तम दाखला दिला. बांगलादेशच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडत त्याने चौफेर फटकेबाजी केली. त्याचे उत्तूंग षटकार तर निव्वळ डोळय़ाचे पारणे फेडणारे ठरले.

रोहित शर्माला प्रारंभी धवनने देखील उत्तम साथ देण्याचा प्रयत्न केला. धवन नंतर यष्टीमागे झेल देत बाद झाला असला तरी तोवर भारताने उत्तम सुरुवात केली होती. या डावखुऱया फलंदाजाने 47 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 40 धावांचे योगदान दिले. रायुडू मात्र फारशी चमक दाखवू शकला नाही. रायुडू बाद झाल्यानंतर बांगलादेशचा यष्टीरक्षक मुश्फिकूर रहीमने जोरदार हातवारे करत अखिलाडूवृत्ती दाखवून दिली. पण, भारताच्या बुलंद इराद्यांवर याचा फारसा विपरीत परिणाम झालाच नाही.

या लढतीत रोहित शर्माच्या झुंजार फटकेबाजीमुळे भारतीय संघ किती षटकांचा खेळ राखून जिंकणार, इतकीच औपचारिकता होती आणि ती लवकरच पार पाडली गेली. धोनीने 37 चेंडूत 33 धावा फटकावल्या. तो तिसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी भारताला फक्त 4 धावांची गरज होती. या विजयासह भारताने स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे.

जडेजाचे 4 बळी

जुलै 2017 नंतर आपली पहिलीच वनडे खेळत असलेल्या जडेजाने बांगलादेशच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडूत काढत 10 षटकात 29 धावात 4 बळी, असे भेदक पृथ्थकरण नोंदवले. एकाच दिवसापूर्वी अफगाणविरुद्ध लाजीरवाण्या पराभवाचा सामना करणाऱया बांगलादेशला येथे देखील त्यांच्या फलंदाजीने चांगलाच दगा दिला.

भुवनेश्वर-बुमराहची उत्तम साथ

फिरकीपटू जडेजाला भुवनेश्वर कुमार (3-32) व जसप्रीत बुमराह (3-37) यांनी प्रत्येकी 3 फलंदाज बाद करत समयोचित साथ दिली. मेहदी हसन मिराज (50 चेंडूत 42) व कर्णधार मश्रफे मोर्तझा (32 चेंडूत 26) यांनी आठव्या गडय़ासाठी 66 धावांची भागीदारी साकारल्यामुळे बांगलादेशला आणखी नामुष्की टाळता आली. 24 तासांपूर्वीच अफगाणविरुद्ध पराभव स्वीकारावा लागलेल्या आणि त्यानंतर अबुधाबी ते दुबई असा 90 मिनिटांचा प्रवास करावा लागलेल्या बांगलादेश संघाला येथे कणाहीन फलंदाजीची चांगलीच किंमत मोजावी लागली.

भारताने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशला प्रथम फलंदाजीला पाचारण केले व लवकरच बांगला पडझडीला जोरदार सुरुवात देखील झाली. लिटॉन दास (7) व नझमुल (7) हे दोन्ही सलामीवीर पहिल्या 6 षटकातच तंबूत परतले.

2 बाद 15 अशी खराब स्थिती असताना शकीब हसन (21) व मुश्फिकूर रहीम या अनुभवी फलंदाजांवर डाव सावरण्याची जबाबदारी होती. पण, शकीबने जडेजाच्या गोलंदाजीवर धवनकडे झेल दिला. वास्तविक, जडेजा यापूर्वी दिल्लीत विजय हजारे चषक स्पर्धेत खेळत होता. पण, येथे हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल व शार्दुल ठाकुर दुखापतग्रस्त झाल्याने अंतिम क्षणी जडेजाला राष्ट्रीय संघात पाचारण केले गेले. त्या संधीचा जडेजाने पुरेपूर लाभ घेतला.

महमुदुल्लाह (25) व मोसद्देक होसेन (12) यांनी सहाव्या गडय़ासाठी 36 धावा जोडल्या आणि पंचांच्या खराब निर्णयाचा फटका बसला नसता तर त्यांनी यात आणखी भर घातली असती. 33 व्या षटकात महमुदुल्लाहला भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर पायचीत दिले गेले.  पण, रिप्लेत चेंडू बॅटचा स्पर्श केल्यानंतरच पॅडवर आदळल्याचे स्पष्टपणे दिसत होते. बांगलादेशने आपले रिव्हय़ू त्यापूर्वीच संपवले असल्याने ते या निर्णयाविरुद्ध दादही मागू शकले नाहीत.

मोर्तझा व मिराज यांनी मात्र आठव्या गडय़ासाठी 66 धावांची भागीदारी साकारत ही पडझड रोखत डावातील सर्वोच्च भागीदारी देखील नोंदवली. मोर्तझाने 32 चेंडूत 2 चौकारांसह 26 तर मेहदी हसन मिराजने 50 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 42 धावांचे योगदान दिले. कर्णधार मोर्तझाने 47 व्या षटकात भुवनेश्वरला सलग दोन षटकार खेचत चाहत्यांचे मनोरंजन केले. पण, नंतर तो त्याच षटकात शॉर्ट फाईन लेगवरील बुमराहकडे झेल देत परतला. त्यानंतर मिराजने बुमराहच्या गोलंदाजीवर धवनकडे झेल दिला.

मुस्तफिजूर शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला आणि इथेच बांगलादेशचा डाव 49.1 षटकात सर्वबाद 173 धावांवर आटोपला होता.

धावफलक

बांगलादेश : लिटॉन झे. जाधव, गो. भुवनेश्वर 7 (16 चेंडूत 1 चौकार), नझमुल झे. धवन, गो. बुमराह 7 (14 चेंडू), शकीब हसन झे. धवन, गो. जडेजा 17 (12 चेंडूत 3 चौकार), रहीम झे. चहल, गो. जडेजा 21 (45 चेंडूत 1 चौकार), मिथुन पायचीत गो. जडेजा 9 (19 चेंडूत 1 चौकार), महमुदुल्लाह पायचीत गो. भुवनेश्वर 25 (51 चेंडूत 3 चौकार), मोसद्देक झे. धोनी, गो. जडेजा 12 (43 चेंडू), मोर्तझा झे. बुमराह, गो. भुवनेश्वर 26 (32 चेंडू), मिराज झे. धवन, गो. बुमराह 42 (50 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), मुस्तफिजूर झे. धवन, गो. बुमराह 3 (9 चेंडू), रुबेल होसेन नाबाद 1 (5 चेंडू). अवांतर 3. 49.1 षटकात सर्वबाद 173.

गडी बाद होण्याचा क्रम

1-15 (लिटॉन, 4.3), 2-16 (नझमुल, 5.1), 3-42 (शकीब, 9.4), 4-60 (मिथुन, 15.4), 5-65 (रहीम, 17.6), 6-101 (महमुदुल्लाह, 32.5), 7-101 (मोसद्देक, 33.2), 8-167 (मोर्तझा, 46.3), 9-169 (मिराज, 47.2), 10-173 (मुस्तफिजूर, 49.1).

गोलंदाजी  : भुवनेश्वर 10-1-32-3, बुमराह 9.1-1-37-3, चहल 10-0-40-0, जडेजा 10-0-29-4, कुलदीप 10-0-34-0.

भारत : रोहित नाबाद 83 (104 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), धवन पायचीत गो. शकीब 40 (47 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), रायुडू झे. रहीम, गो. रुबेल 13, धोनी झे. मिथुन, गो. मोर्तझा 33 (37 चेंडूत 3 चौकार), दिनेश नाबाद 1. अवांतर 4. एकूण 36.2 षटकात 3/174

गडी बाद होण्याचा क्रम

1-61 (धवन, 14.2), 2-106 (रायुडू, 23.6), 3-170 (धोनी, 35.3) गोलंदाजी : मोर्तझा 5-0-30-1, मिराज 10-0-38-0, रहमान 7-0-40-0, शकीब 9.2-0-44-1, रुबेल होसेन 5-0-21-1

 

Related posts: