|Thursday, April 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » आता स्टारकिडपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची  : आयुषमान खुरानाचे मत

आता स्टारकिडपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची  : आयुषमान खुरानाचे मत 

सुकृत मोकाशी / हिमांशू बायस

सध्याच्या जमान्यात गुणवत्तेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे तुम्ही स्टारकिड आहात की नाही याने जास्त फरक पडत नाही, असे मत अभिनेता आयुषमान खुराना याने पुण्यात व्यक्त केले.

‘बधाई हो’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ‘तरूण भारत’शी खास बातचीत केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी केले आहे. विनीत जैन, आलेया सेन, हेमंत भंडारी आणि अमित रवींद्रनाथ शर्मा यांची ही निर्मिती असून प्रीती शहानी या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. येत्या 12 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आयुषमान म्हणाला, सध्या स्टारकिडचे महत्त्व असले, तरी गुणवत्तेला महत्त्व आहे. पण, काही स्टारकिड इंडस्ट्रीमध्ये चांगले काम करत आहेत. यामध्ये वरूण धवन, आलिया भट, रणधीर कपूर यांचा समावेश होतो. ते खरोखरच तिथपर्यंत पोहचण्याकरिता पात्र आहेत. परंतु, ते स्टारकिड असल्याने त्यांना वारसा जपण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागतो. आम्ही स्टारकिड नसल्याने आमच्यावर तितकासा दबाव नसतो.

सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे .याबाबत बोलताना आयुष्मान म्हणाला, या चित्रपटात नकुल कौशिक असे माझ्या भूमिकेचे नाव आहे. उतरत्या वयात असताना माझी आई गर्भवती होते. त्यामुळे ही गोष्ट मला लाजिरवाणी वाटते. माझ्या मित्र-मैत्रीणींमध्ये आणि माझ्या गर्लप्रेंडच्या आईसमोर मला या गोष्टीची लाज वाटते. पण यातूनच एक अशी कथा समोर येते, जी प्रेक्षकांना पोट धरून हसवताना दिसेल. हा चित्रपट एका वेगळय़ा विषयावर आधारित असून ट्रेलरला मिळालेला प्रतिसादाला पाहून चित्रपटालादेखील लोक तेवढाच प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा त्याने यावेळी व्यक्त केली.

बधाई होमध्येही आयुषमान गाणार

आयुषमानने आपल्या चित्रपटामध्ये एकतरी गाणे गायले आहे. ‘पानीदा’, ‘नज्म नज्म’ यासारखी त्याने गायलेली गाणी सुपरहिट झाली आहेत. त्यामुळे ‘बधाई हो’ या चित्रपटातील त्याने गायलेल्या गाण्याची उत्सुकता वाढली आहे.

Related posts: