|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » खतनिर्मितीचे सहा छोटे प्रकल्प

खतनिर्मितीचे सहा छोटे प्रकल्प 

सावंतवाडी नगरपालिकेचा निर्णय : पावणेतीन कोटीचा निधी मंजूर

संतोष सावंत / सावंतवाडी:

सावंतवाडी शहरात दरदिवशी सुमारे 11 टन कचरा नगरपालिका गोळा करते. महिन्याला 330 टनच्या आसपास कचरा डंपिंग ग्राऊंडमध्ये जमा होतो. आता हा कचरा डंपिंग ग्राऊंडमध्ये जमा न करता प्रभागवार कचऱयापासून कंपोस्ट खत निर्मितीचे सहा छोटे-मोठे प्रकल्प उभारण्याचा ठराव घेण्यात आला. यासाठी 2 कोटी 75 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

सावंतवाडी पालिकेच्या कारिवडे येथील डंपिंग ग्राऊंडच्या पाच एकर जागेला आता नवी झळाळी प्राप्त होणार आहे. या जागेत लवकरच कचरा निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. सावंतवाडीची लोकसंख्या 40 हजाराच्या घरात आहे. या शहराची पालिका क वर्गात मोडते. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात शहराने राज्यात नंबरवन पटकावला होता.

खत निर्मिती प्रकल्प

शहरात दर दिवशी ओला कचरा सहा टन तर सुका कचरा पाच टन मिळून 11 टन कचरा मिळतो. हा कचरा आंबोली मार्गावरील प्रवेशद्वारालगत डंप केला जातो. या कचऱयापासून दुर्गंधी पसरू नये, यासाठी नवा प्रयोग राबविला. तो यशस्वी झाला. आता या साचलेल्या कचऱयापासून कंपोस्ट खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कचऱयापासून मशिनद्वारेच खत तयार होणार आहे. दिवसाला सुमाले दहा टन खत निर्मिती करण्याचे प्रयोजन आहे. यासाठी मशिनरी मागविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत मत्स्य खत व गांडूळ खत निर्मिती सुरू आहे. या खताची विक्री केली जात आहे.

सहा ठिकाणी खत प्रकल्प

नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, कचरा विल्हेवाट यासाठी अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या शहरात आता लवकरच येत्या महिन्याभरात कचऱयापासून खत निर्मितीचे सहा ठिकाणी प्रकल्प सुरु केले जाणार आहेत. सावंतवाडी पालिकेजवळ बाजारपेठेतील शौचालय, लक्ष्मीनगर, ज्युस्तीन नगर, गोठण रस्ता, सार्वजनिक शौचालय, बाहेरचावाडा, झिरंगवाडी या ठिकाणी खत निर्मिती करणाऱया मशिनी बसवून खत तयार करण्यात येणार आहे. या खत विक्रीतून शहराची नवी ओळख निर्माण करून कचरा मुक्त शहर तयार करण्यात येणार आहे.

कारिवडे जागा डेव्हलप करणार

नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, कारिवडे येथे पाच एकर जागा डंपिंग ग्राऊंडसाठी आहे. परंतु त्या भागातील जनतेला प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून ती जागा मोकळी ठेवली. मात्र, आता बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही जागा विकसित करण्याचा विचार आहे. या जागेत फक्त सुक्या कचऱयापासून खत निर्मिती करता येऊ शकते का, याची चाचपणी सुरू आहे. तसेच या भागात वनौषधी व अन्य झाडे लावून हा भाग विकसित करण्यात येणार आहे. नियोजित डंपिंग ग्राऊंड असले तरी कारिवडेवासीयांच्या भावना लक्षात घेऊन वेगवेगळय़ा धर्तीवर तेथे विकास करण्यात येणार आहे.

आरोग्य सभापती आनंद नेवगी म्हणाले, सावंतवाडी शहरात मोठय़ा प्रमाणात कचरा साचतो. त्यापासून जिमखाना मैदान, गार्डन, स्मशानभूमी या ठिकाणी कचऱयापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. आता त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.