|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ओडिशातील राजकारण तापले

ओडिशातील राजकारण तापले 

पंतप्रधान मोदींचा नवीन पटनायकांवर निशाणा : विमानतळासह अनेक प्रकल्पांचे केले अनावरण

वृत्तसंस्था/ तालचर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या तालचर येथील खत प्रकल्पाच्या नुतनीकरण कार्याचे अनावरण केल्यावर सभेला संबोधित करतेवेळी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला आहे. पंतप्रधानांनी स्वतःच्या संबोधनात 2019 च्या निवडणुकीच्या लढाईचे चित्र मांडून स्वतःच्या विजयाचा दावा देखील केला. खत प्रकल्पातून 36 महिन्यांनी उत्पादन सुरू होईल आणि याचे उद्घाटन करण्यासाठीच मीच येईन असा विश्वास देतो, असे उद्गार मोदींनी यावेळी काढले आहेत. तसेच शनिवारी मोदींनी ओडिशातील एका विमानतळाचे अनावरण केले असून याचा लाभ लगतच्या राज्यांना देखील होणार आहे.

विशेष म्हणजे या भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला कमी तर नवीन पटनायकांनाच अधिक लक्ष्य केले. ओडिशाच्या राजकीय मैदानात बीजेडी विरुद्ध भाजप या लढाईची पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न मोदींकडून झाल्याचे मानले जात आहे. 2019 मध्ये विरोधकांच्या एकजुटीनंतर देखील आपलेच सरकार सत्तेवर येईल असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे. खत प्रकल्पाच्या कार्यक्रमानंतर मोदींनी भाजपच्या एका सभेला संबोधित केले. या सभेत मोदींनी केंद्र सरकारची कामगिरी तसेच योजना मांडल्या, तर पटनायक यांच्या राज्य सरकारवर टीका देखील केली.

36 महिन्यांनी पुन्हा येईन..

खत प्रकल्पावर सरकार सुमारे 13 हजार  कोटी रुपये खर्च करणार आहे. 2000 मध्ये तालचर खत प्रकल्पाबद्दल निर्णय घेण्यात आला होता, परंतु तेव्हा याबद्दल कोणतीच कृती करण्यात आली नव्हती.अधिकाऱयांनी 36 महिन्यांत प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती दिली आहे. 36 महिन्यांनी मी पुन्हा तुमच्यासमोर येऊन प्रकल्पाचे लोकार्पण करणार असल्याचे मोदी म्हणाले.

शेतकऱयांचे सक्षमीकरण

गोरखपूर, झारखंड, तेलंगणा आणि बिहार येथील खत प्रकल्पांचा उल्लेख करत मोदींनी शेतकरी तसेच कृषी व्यवस्थेला बळकटी प्रदान करण्यासाठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करत असल्याचे म्हटले. 1 रुपयातील केवळ 15 पैसेच गरीबांपयंत पोहोचायचे असे राजीव गांधी यांनी म्हटले होते. परंतु बँकिंगसोबत लोकांना जोडून अशाप्रकारची समस्या संपविल्याचे उद्गार मोदींनी यावेळी काढले.

वैद्यकीय योजना

आयुष्मान भारत योजनेशी बहुसंख्य राज्ये संलग्न झाली आहेत. ओडिशाच्या जनतेला याचा लाभ मिळावा की नको असा प्रश्न मोदींनी जनतेला विचारला. ओडिशात अनेक वैद्यकीय महाविद्यालये तसेच अत्याधुनिक रुग्णालयांवर काम सुरू असून केंद्राने याकरता निधी दिल्याचा दावा मोदींनी केला.

पटनायक लक्ष्य

2014 मध्ये ग्रामीण स्वच्छतेची कक्षा ओडिशात केवळ 10 टक्के होती. परंतु आमच्या सरकारने यात वेग आणण्याचा प्रयत्न केल्याने हे प्रमाण आता 55 टक्क्यांवर पोहोचले आहे. देश स्वच्छतेत पुढे जातोय, ओडिशा मागे राहिल, शौचालयांची राज्यात निर्मिती होत नसल्याचे मी पटनायक यांना कळविले होते. माता हिंगुलाच्या भूमीवरून मी पुन्हा एकदा पटनायक यांना याप्रकरणी पावले उचलण्याचे आवाहन करतो. ओडिशाच्या जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी अत्याधिक स्वच्छतेची गरज असल्याचे विधान मोदींनी केले.

Related posts: