|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिशपचा जामीन अर्ज नामंजूर

बिशपचा जामीन अर्ज नामंजूर 

नन बलात्कार प्रकरण : 2 दिवसांची पोलीस कोठडी

कोट्टायम

 केरळच्या कोट्टायम येथील न्यायालयाने ननवरील बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला बिशप प्रँको मुलक्कलचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच बिशपला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारच्या सुनावणीवेळी कडेकोट बंदोबस्तात बिशपला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

तपास पथकाने तीन दिवसांच्या चौकशीनंतर बिशपला अटक केल्याचा युक्तिवाद करत आरोपीच्या वकिलांनी दिलासा देण्याची मागणी केली होती. तर जामीन अर्जाला विरोध करत पोलिसांनी प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी 3 दिवसांची कोठडी आवश्यक असल्याचे म्हटले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने बिशपची सोमवारी दुपारी 2.30 वाजेपर्यंत पोलीस कोठडीत  रवानगी करण्याचा निर्णय दिला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून शनिवारी बिशपला डिस्चार्ज मिळाला होता. शुक्रवारी रात्री छातीत कळ येत असल्याची तक्रार केल्यावर बिशपला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 54 वर्षीय बिशप मुलक्कलला शुक्रवारी रात्री एर्नाकुलमच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयातून कोट्टायम येथे आणले गेले होते. रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात 6 तासांपर्यंत आरोपीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.