|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » युतीमधील 14 आमदार मुंबईत?

युतीमधील 14 आमदार मुंबईत? 

भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’चा परिणाम : सरकारवरील गंडांतराची छाया गडद

प्रतिनिधी\ बेंगळूर

बेळगाव जिल्हा काँग्रेसमधील वादामुळे निर्माण झालेली कोंडी सोडविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलेले असतानाच बंडखोरीचा पवित्रा घेतलेल्या कर्नाटकातील युतीमधील 16 आमदारांकडून सरकारला धोका निर्माण झाला आहे. 8 आमदारांनी यापूर्वीच मुंबई गाठून तेथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्य केल्याची माहिती सुत्रांकडून उपलब्ध झाली आहे. शनिवारी आणखी सहा आमदार मुंबईला रवाना झाले. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ राबवून युती सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न करणाऱया भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांना यश मिळाल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अनिवार्य कारणास्तव काँग्रेसने निजदशी युती करून सत्ता स्थापन केली. पण युतीमधील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने अधूनमधून ठिणगी उडत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शनिवारी मुळबागिलचे आमदार एच. नागेश, चिक्कबळ्ळापूरचे आमदार डॉ. सुधाकर आणि होसकोटेचे आमदार एम. टी. बी. नागराज यांनी कोणताही सुगावा लागू न देता चेन्नईमार्गे तर आणखी तेघांनी हैदराबादमार्गे मुंबई गाठली आहे.

आमदार एच. नागेश, डॉ. सुधाकर आणि एम. टी. बी. नागराज या काँग्रेस आमदारांनी शनिवारी सकाळी बेंगळूरमधील एका हॉटेलमध्ये एकमेकांची भेट घेतली. त्यानंतर होसूर रोडमार्गे कारने चेन्नईच्या दिशेने प्रयाण केले. तिन्ही आमदारांचे मोबाईल ‘नॉट रिचेबल’ येत आहेत. या पैकी दोन आमदार माजी मुख्यमंत्री आणि युती सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय आहेत.

मुळबागिलचे अपक्ष आमदार एच. नागेश हे मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. परंतु, अखेरच्या क्षणी त्यांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहेत. निजद-काँग्रेस युतीला पाठिंबा दिल्यानंतर आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला होता. मुंबईत असणाऱया आमदारांची भेट घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

गुप्तचर विभागाकडून मुख्यमंत्र्यांना माहिती

पक्षाविरुद्ध भूमिका घेतलेल्या 8 आमदारांचे काही दिवसांपासूनच मुंबईत वास्तव्य असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. एअरटेलसह इतर कंपन्यांची सीमकार्डे असणारे आमदारांचे मोबाईल ट्रक झाले आहेत. बीएसएनएल सीमकार्डे असलेल्या आमदारांचे मोबाईल ट्रक होत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. युती सरकारमधील आमदार महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे युती सरकारवर गंडांतर ओढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

आमदारांवर मुंबईत हल्ल्याची शक्यता

मुंबईत असणाऱया आमदारांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हल्ला होण्याची किंवा घेराव घालण्याची शक्यता असल्याने या आमदारांना सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था भाजप नेत्यांनी केली आहे. कोणत्याही क्षणी युतीचे आमदार भाजप नेत्यांशी संपर्क साधतील. त्यामुळे सतर्क रहा, आपण सांगेन तेव्हा बेंगळूरला तातडीने दाखल व्हा, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी पक्षातील आमदारांना दिली आहे.

 सिद्धरामय्या यांनी सांगितल्यास सरकार कोसळेल

काँग्रेस आमदार के. वाय. नंजेगौडा यांनी सरकारला धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सूचना दिली तर युती सरकार कोसळेल, असे वक्तव्य नंजेगौडा यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस गोटात खळबळ उडाली आहे.

ऑपरेशन कमळमध्ये पंतप्रधानांचा सहभाग : दिनेश गुंडूराव

काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा मतभेदाची दरी रूंद झाली आहे. मात्र, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ऑपरेशन कमळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग आहे, असा आरोप त्यांनी केला. पक्षातील सर्व आमदार आपल्या संपर्कात आहेत. आमदार सुधाकर आणि एम. टी. बी. नागराज यांच्याशी आपण शनिवारी दुपारी चर्चा केली आहे. त्यांच्यासह कोणही आमदार पक्ष सोडून जाणार नाही. मात्र, याविषयी केवळ अफवा परसली आहे, असे त म्हणाले.