|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » क्रिडा » तेजाकडून प्रशिक्षकपदाचा राजीनामा

तेजाकडून प्रशिक्षकपदाचा राजीनामा 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया द्रौणाचार्य पुरस्कारासाठीच्या यादीतून वगळण्यात आलेले भारताचे तिरंदाज प्रशिक्षक जीवनज्योत सिंग तेजा यांनी आपल्या कंपाऊंड तिरंदाजी प्रशिक्षकपदाचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे. चंदीगडमध्ये तेजा यांनी पत्रकार परिषदेत ही बातमी दिली.

गेल्या महिन्यात झालेल्या जकार्तामधील आशियाई क्रीडास्पर्धेत प्रशिक्षक तेजा यांनी राष्ट्रीय कंपाऊंड तिरंदाज संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. भारतीय तिरंदाजपटूंच्या निवड प्रक्रियामध्ये पारदर्शकता ठेवण्याची मागणी तेजा यांनी केल्याने भारतीय तिरंदाजी संघटनेने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून वर्षभरासाठी निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान द्रौणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केलेल्या यादीमध्ये आपले नाव हेतूस्पर वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ तेजा यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

गेल्या चार वर्षांच्या कालावधीत विविध क्रीडा प्रकारातील प्रशिक्षकांच्या कामगिरीचा आढावा घेऊनच द्रौणाचार्य पुरस्कारांसाठी यादी तयार केली जाते. त्यानंतर शिफारशीसाठी ती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे पाठविली जाते. द्रौणाचार्य पुरस्कार विजेत्याला रोख पाच लाख रूपयांचे बक्षीस दिले जाते. अजीवन विभागात द्रौणाचार्य पुरस्काराकरिता हॉकीत लोबो, क्रिकेटमध्ये तारक सिन्हा, ज्युडोमध्ये जीवनकुमार शर्मा आणि ऍथलेटिक्समध्ये व्ही.आर.बेडू यांच्या नांवाचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.