|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत ‘श्रीं’ च्या विसर्जनासाठी मोठा बंदोबस्त

मिरजेत ‘श्रीं’ च्या विसर्जनासाठी मोठा बंदोबस्त 

 मिरज

दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिध्द असणाऱया शहरातील अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी झाली आहे. राजकीय पक्ष आणि संघटनांनी आकर्षक विद्युत रोषणाई करुन मिरवणूक मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारल्या आहेत. पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. काही मंडळांनी ढोल पथकांबरोबर अन्य पारंपारीक वाद्ये आणि पंजाबी, राजस्थानी वाद्यवृंद आणि नृत्य कलाकार आणणार आहेत. 175 हून अधिक मंडळांच्या ‘श्रीं’ चे विसर्जन होणार असून, दोन लाखाहून अधिक गणेशभक्त विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येतील अंदाज आहे. 

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया मिरज शहरातील गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. अनंत चतुर्दशी दिवशी होणारी श्रींची विसर्जन मिरवणूक तर महाराष्ट्रासह आसपासच्या अनेक राज्यात प्रसिध्द आहे. एकच मिरवणूक मार्ग असल्याने येथे भाविकांचीही मोठय़ा संख्येने हजेरी लाभते. ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतीक देखाव्यांबरोबर अनेक प्रबोधनात्मक देखाव्यांना येथे प्राधान्य दिले जाते. या उत्सवाला 2009 साली दंगलीचे गालबोट लागल्याने शहर संवदेनशील म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. प्रशासनाने उत्सवाची गांभीर्याने दखल घेऊन प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो.

स्वागत कमानी सजल्या

मिरवणूक मार्गावर उभारण्यात येणाऱया भव्य आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजलेल्या स्वागत कमानी हे या मिरवणुकीचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. सध्या या मिरवणूक मार्गावर अशा दहा राजकीय पक्ष आणि संघटनांकडून भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एकता सांस्कृतीक मंडळ, धर्मवीर संभाजी तरुण मंडळ, विश्वशांती संघटना, मनसे, मराठा महासंघ, शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, हिंदू-मुस्लिम गणेशोत्सव मंडळ, छत्रपती शिवाजी गणेशोत्सव मंडळ आणि विश्वश्री पैलवान गणेशोत्सव मंडळाचा समावेश आहे. या कमानीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कमानीलगतच संबंधीतांनी स्वागत स्टेज उभारले असून, तेथून गणरायाचे स्वागत केले जाणार आहे.

                         डॉल्बीबाबत प्रशासनाचे कठोर भूमिका

प्रशासनाने डॉल्बीबाबत यंदा कठोर भूमिका घेतली असली आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या ध्वनीमर्यादेचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, सातव्या आणि नवव्या दिवशी पोलिसांच्या नाकावर टिच्चून कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दणदणाट केलाच. आता अनंत चतुर्दशीच्या मिरवणूकीदिवशी मंडळे प्रशासनाच्या आदेशाचे पालन करणार का? याकडे लक्ष लागूतन राहिले आहे. काही मंडळांनी समजूतदारपणा दाखवत मिरवणुकीत झांज, ढोल पथक, अन्य पारंपारीक वाद्यांना प्राधान्य दिले आहे. काही मंडळांनी केरळ, पंजाब राजस्थान मधील नृत्य कलाकारांना पाचारण केले आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नामवंत बॅन्ड आणि बॅन्जो कंपन्यांची मिरवणुकीत हजेरी लागणार आहे. मिरवणुकीत कोठेही डॉल्बीचा वापर होऊ नये म्हणून पोलिस यंत्रणा दक्ष करण्यात आली आहे.

175 मंडळांच्या श्रींचे विसर्जन

मिरज शहरात शहर आणि गांधी चौकी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात साधारण 350 हून अधिक मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. त्यापैकी पाचव्या सातव्या आणि नवव्या दिवशी 150 हून अधिक मंडळांच्या श्रींचे विसर्जन झाले आहे. उर्वरीत 175 मंडळांच्या श्रींचे आज अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने गणेश तलाव आणि कृष्णाघाट येथे विसर्जनाची सोय केली आहे. मोठय़ा गणेशमुर्तींचे घाटावर विसर्जन होणार आहे. तर गणेश तलावात मत्स्यराज भोई समाजाचे कार्यकर्ते विसर्जनासाठी कार्यरत आहे. मिरवणुकीत अनेक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईला प्राधान्य दिले आहे. तर काही मंडळांनी ऐतिहासिक आणि पौराणिक विषयावर आधारीत सजीव देखाव्यांना प्राधान्य दिले आहे. 

प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात

मिरवणुकीला दोन लाखहून अधिक गणेशभक्तांची हजेरी लागण्याची शक्यता असल्याने  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त तैनात केला आहे. स्वतः पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा मिरवणुकीवर लक्ष ठेवून राहणार आहेत. पोलिस उपाधिक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक 440 पोलीस कर्मचारी 110 महिला कर्मचारी असे 31 अधिकारी 550 पोलिस कर्मचारी, राज्या राखीव दल, केंद्रीय राखीव दल आणि  जलद कृती दलाच्या प्रत्येकी एक तुकडय़ा तैनात करण्यात आले आहे.

 मिरवणूक मार्गावर 22 ठिकाणी सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात आले आहे. त्याशिवाय काही टेहळणी मनोरेही तैनात केले आहेत. महिला दक्षता पथक, छेडछाड विरोधी पथक मिरवणूक मार्गावर कार्यरत राहणार आहेत. याशिवाय शहरातील काही चौकात मनाई आदेश लागू करण्याबरोबर वाहतुकीची पर्यायी व्यवस्था, पार्किंगची स्वतंत्र सोय केली गेली आहे.