|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भांडणाचे पर्यवसान पिता-पुत्राच्या आत्महत्येत

भांडणाचे पर्यवसान पिता-पुत्राच्या आत्महत्येत 

सांगेच्या भाटी पंचायत क्षेत्रातील दापोडे गावात घडलेली दुर्दैवी घटना

प्रतिनिधी/ सांगे

पिता-पुत्रामध्ये झालेल्या भांडणाचे पर्यवसान दोघांनीही आपली जीवनयात्रा संपविण्यात होण्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास सांगे तालुक्यातील भाटी पंचायत क्षेत्रातील दापोडे या गावात घडली. या घटनेमुळे गावात तसेच आजुबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यापैकी वडील चंदकांत गावकर (57) याने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली, तर मुलगा सुदेश (21) याने कीटकनाशक प्राशन करून या जगाचा निरोप घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोडे-भाटी येथे राहणार चंदकांत हा रात्री दारू पिऊन आल्याने मुलगा सुदेश याने जाब विचारला. दारू पिऊन का आलात, असा प्रश्न केल्याने वडिलांना राग आला व त्यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर  रागाच्या भरात चंद्रकांत घराबाहेर पडला व घराशेजारीच असलेल्या पाण्याच्या डोहात त्याने उडी घेतली. पुत्र सुदेश त्या ठिकाणी धावून आला आणि त्याला वडिलांनी त्या डोहात उडी घेतली आहे याची कल्पना आली. त्याने त्वरित त्या डोहात उडी मारून वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

वडिलांचा शोध निष्फळ

पण एक तर डोहात पाणी जास्त व रात्रीची वेळ, त्यामुळे बराच वेळ शोध घेऊनही वडील काही त्याच्या हाती लागले नाहीत. कदाचित हे प्रकरण आपल्या अंगावर शेकणार असा विचार सुदेशच्या मनात आला असावा किंवा आपल्यामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याची भावना त्याला सतावू लागली असावी. त्यानंतर तो सरळ घरात आला व त्याने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवून टाकली.

घटनेची माहिती मिळताच सांगे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुदेशचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील प्रक्रियेसाठी बांबोळीला पाठवून दिला. चंद्रकांत याच्या मृतदेहाचा शनिवारीही शोध घेण्यात आला. शेवटी अग्निशामक दलाच्या जवानांनादुपारी 1 च्या सुमारास चंद्रकांतचा मृतदेह सापडला. सांगे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बांबोळीला पाठवून दिला. उपनिरीक्षक मनोज मळीक व साहाय्यक उपनिरीक्षक अरविंद नांगेकर यांनी या प्रकरणी पंचनामा केला.

घरात एकटी राहिली आई

दोन महिन्यांपूर्वीच चंद्रकांतची आई म्हणजेच सुदेशच्या आजीचे निधन झाले होते. चंद्रकांत व सुदेश हे पिता-पुत्र शेती व गुरे पाळण्याचा व्यवसाय करत होते. आता त्यांच्या घरात सुदेशची आई एकटीच राहिली आहे. सुदेशच्या दोन बहिणींचे यापूर्वीच लग्न झालेले आहे. चंद्रकांत व सुदेश यांचे घर गावातील इतर घरांपासून बरेच दूर जंगलात आहे. सुदेशची आई आता या ठिकाणी आपले जीवन कसे काढणार याची चिंता गावातील लोकांना लागून राहिली आहे.

 

Related posts: