|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 7 जणांचा चावा

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 7 जणांचा चावा 

प्रतिनिधी/ संकेश्वर

पिसाळलेल्या कुत्र्याने 7 जणांचा चावा घेतला असून त्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी 8 वाजता सोलापूर (ता. हुक्केरी) येथे उघडकीस आली. जखमींवर संकेश्वर व कणगले येथील शासकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परिणामी सदर पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात दहशत पसरली असून मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

 ताहिरा अशरफ मुजावर (वय 5), शाहिरा अशरफ मुजावर (वय 27) अशी जखमी झालेल्या मायलेकींची नावे असून शुभम पुंडलिक पुजारी (वय 7), पुंडलिक रामाप्पा पुजारी (वय 40), राजू बाबू अस्वले (वय 51), शोभा काशिनाथ चव्हाण (वय 44) व संजीवनी सुरेश म्हकांळे (वय 11) अशी अन्य जखमींची नावे असून हे सर्व सोलापूर येथील रहिवासी आहेत. या जखमींवर संकेश्वर व कणगले येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास आई शाहिरा या ताहिराला शाळेस सोडण्यास जात असतानाच अचानक हल्ला करत पिसाळलेल्या कुत्र्याने ताहिराच्या पायाचा चावा घेतला. या हल्ल्यात ताहिरा जमिनीवर कोसळताच कुत्र्याने तिच्या चेहऱयाचा व डोक्याचा चावा घेतला. यावेळी ताहिराची सुटका करणाऱया तिच्या आईचाही चावा कुत्र्याने घेतला. या हल्ल्यात ताहिरा गंभीर जखमी झाली आहे. यानंतर कुत्र्याने रस्त्यावर दिसणाऱया प्रत्येकाचाच चावा घेऊ लागल्याने नागरिक अक्षरशः पळ काढू लागले होते. परिणामी कुत्र्याच्या हल्ल्याने गाव परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायतीने दिला डांगोरा

पिसाळलेला कुत्रा हायवे मार्गाने गावात शिरला असून तो दिसेल त्याचा चावा घेत आहे. तेव्हा गावकऱयांनी आपले व आपल्या मुलाचे रक्षण करावे. तसेच जे कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेत त्यांनी आपली नावे ग्रामपंचायत कार्यालयात नोंदवावीत, असा डांगोरा गावातील सर्व भागात देण्यात आला आहे. तसेच या कुत्र्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. कुत्रा सापडताच त्याचा बंदोबस्त करण्यात येणार अशी माहिती ग्रामपंचायतीचे पिडीओ प्रशांत नेर्ली यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसापासून या कुत्र्याने या भागात धुमाकूळ घातला असून गाव परिसरात भीती निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायतीने उपाययोजना राबवाव्यात

दरम्यान, गत महिन्यात व्हन्नोळी येथील एका कुत्र्याच्या कळपाने एका महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच सोलापुरात 7 जणांवर पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या परिसरात भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे आली आहे. सध्या शहरी व ग्रामीण भागात फार मोठय़ा प्रमाणात भटक्या कुत्र्यांचे कळप दिसून येतात. ही धोक्याची बाब असून पूर्वदक्षता म्हणून या कुत्र्याचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.

Related posts: