|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दहा महिने समाज मंदिरातच आश्रयाला

दहा महिने समाज मंदिरातच आश्रयाला 

मालवण न.पा. सफाई कामगारांची व्यथा : जीर्ण झाल्याने 24 तासांत इमारत खाली करण्याचे दिले होते आदेश :पगारातून कापून घेतले जातेय खोलीभाडे : इमारत दुरुस्त कधी होणार,याचे उत्तर सापडेना

वार्ताहर / मालवण:

 चौवीस तासांत इमारत खाली करण्याचे आदेश देत मालवण पालिकेने सफाई कर्मचाऱयांना बेघर बनविले आणि गेले दहा महिने नादुरुस्त इमारतीच्या जागी नवीन इमारत उभारण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने सफाई कर्मचाऱयांसाठी समाज मंदिरच आसरा बनले आहे. समाज मंदिरातील लहान खोल्यांमुळे सामानाची अडचण होत असून अजून किती महिने बेघर राहवे लागणार, या प्रश्नाचे पालिका प्रशासनाकडे उत्तरच नाही.

 मालवण नगरपालिकेच्या सफाई कामगार व कर्मचाऱयांसाठी पालिकेमार्फत  बांगीवाडा येथे उभारण्यात आलेले दुर्बल घटक निवासस्थान धोकादायक बनल्यानंतर सफाई कामगारांना तात्काळ खोल्या खाली कराव्या लागल्या होत्या. परंतु त्यांना शहरात खोल्या न मिळाल्याने अखेरीस बांगीवाडा येथील समाजमंदिराचा आसरा घ्यावा लागला. परंतु दुर्बल घटक योजनेतील कर्मचारी निवसास्थानांच्या दुरुस्तीबाबत नगरपालिकेकडून  कार्यवाही न झाल्याने गेले दहा महिने चार सफाई कर्मचारी कुटुंबांना समाजमंदिरात राहवे लागत आहे.

 मालवण नगरपरिषदेमार्फत 1985 मध्ये पालिकेतील सफाई कामगारांकरिता बांगीवाडा येथे नाटय़गृहामागील बाजूस दुर्बल घटक निवासस्थान उभारण्यात आले होते. या इमारतीत नऊ खोल्या आहेत. या निवासस्थानात चार सफाई कामगार व दोन कर्मचारी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. मात्र, ही इमारत जीर्ण बनल्याने येथील रहिवाशांनी वारंवार नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. चार वर्षांपूर्वी या इमारतीचा प्रश्न गंभीर बनल्यानंतर पालिकेमार्फत या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानुसार ही इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने 27 ऑक्टोबर रोजी नगरपालिका प्रशासनाने इमारतीतील रहिवाशांना नोटीस काढून राहत असलेली खोली चौवीस तासांच्या आत खाली करण्याचे फर्मान काढले होते.

खोल्या न मिळाल्याने समाज मंदिराचा आधार

 नगरपालिका प्रशासनाने इमारतीतील खोली तात्काळ खाली करण्याचे आदेश काढल्यानंतर या सफाई कामगार व दोन कर्मचाऱयांनी लागलीच खोल्या शोधण्यास सुरुवात केली होती. परंतु या कर्मचाऱयांना शहरात खोल्या न मिळाल्याने दुर्बल घटक निवासस्थानाच्या बाजूला असणाऱया समाज मंदिरात राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती नगरपालिका प्रशासनाला केली होती. अखेरीस चार कर्मचारी कुटुंबियांना समाज मंदिरात राहण्याची परवानगी मिळाली.

सफाई कर्मचारी दुर्बल घटक निवासस्थानाच्या प्रतीक्षेत

 गेले दहा महिने चार सफाई कर्मचारी पुटुंबे नगरपालिकेच्या समाजमंदिरात वास्तव्यास आहेत. परंतु अद्यापही सफाई कर्मचारी दुर्बल घटक निवासस्थानांच्या दुरस्तीबाबत पालिकेकडून कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे सफाई कर्मचारी  निवासस्थानांच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सफाई कर्मचारी समाज मंदिरात राहत असूनही त्यांच्या पगारातून पालिका दरमहा निवासस्थान भत्ता रक्कम कापून घेत आहे. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर कर्मचारी निवासस्थान उभारण्याची कार्यवाही करावी, अशी कर्मचाऱयांची मागणी आहे.