|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेडमध्ये भीमसैनिकांनी दोन तास महामार्ग रोखला!

खेडमध्ये भीमसैनिकांनी दोन तास महामार्ग रोखला! 

डॉ. आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरण,

समाजकंटकांच्या अटकेसाठी 15 दिवसांची ‘डेडलाईन’,

आरोपींना न पकडल्यास ‘बांगडय़ा भरो’ आंदोलन छेडणार

प्रतिनिधी /खेड

शहरातील जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनाप्रकरणी सहा महिन्यानंतर समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्याच्या निषेधार्थ संतप्त भीमसैनिकांनी सोमवारी रस्त्यावर उतरले. आदोलकांनी दोन तास भरणे येथे महामार्ग रोखून धरला. यावेळी समाजकंटकांच्या अटकेसाठी 15 दिवसांची ‘डेडलाईन’ देण्यात आली असून कारवाई न झाल्यास 10 ऑक्टोबर रोजी पोलिसांना ‘बांगडय़ा भरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा ‘रिपाइं’चे कोकण प्रदेश अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड यांनी दिला.

26 मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेच संतापजनक प्रकार घडला होता. बुधवारी या घटनेला 6 महिने पूर्ण होतील. मात्र याप्रकरणी समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. आरोपींना पकडण्यासाठी तीनवेळा ‘डेडलाईन’ देऊनही आरोपी मोकाटच आहेत. या प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे सोपवूनही अद्याप कोणावरच कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेसह शासनाला जागे करण्यासाठी आकमक भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरले.

सोमवारी भरणे येथील महामार्गावरच ठिय्या मारत त्यांनी रास्तारोको केले. या आंदोलनात खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वरसह जिल्हय़ाबाहेरील भीमसैनिकही बहुसंख्येने सहभागी झाले होते. पुतळा विटंबना करणाऱया समाजकंटकांना वाचवण्याची पोलिसांनी सुपारी घेतली आहे का? असा सवाल उपस्थित करत भरणे येथे चारही बाजुंनी नाकाबंदी केली. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र रूग्णवाहिका व स्कूल बसेस यांना मार्ग मोकळा करून देण्यात आला. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष के. डी. कदम, सिद्धार्थ कासारे, सिद्धार्थ मर्चंडे, आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष गिरीष गमरे यांच्यासह आर.पी.आय.च्या वरिष्ठ नेत्यांनी पोलीस यंत्रणांच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढत पोलिसांनी समाजकंटकांना अटक न केल्यास भीमसैनिकच आरोपींच्या मुसक्या आवळतील, असा इशारा दिला.

आरोपीस पकडून देणाऱयास बक्षीस

रिपाईचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी पोलीस यंत्रणेवर टीकास्त्र सोडत पोलिसांनी 15 दिवसांत आरोपींच्या मुसक्या आवळल्यास त्यांचे निश्चितच अभिनंदन करू, अन्यथा पोलिसांनाच बांगडय़ा भरण्याची तंबी दिली. डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ाची विटंबना करणाऱया आरोपीचा खून करणाऱयास स्वतः 5 लाख रूपयांचे बक्षीस देण्याचेही त्यांनी जाहीर केले.

पोलीसांच्या आश्वासनाने आंदोलन स्थगित

पोलीस उपविभागीय अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर हे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. या प्रकरणाच्या तपासात पोलीस यंत्रणा दक्ष असून आरोपींच्या मुसक्या आवळणारच, असे आश्वासन देताच संतप्त भीमसैनिक शांत झाले. यानंतरच रास्तारोको स्थगित करण्यात आला. महामार्गावर पोलिसांची जादा कुमक तैनात करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे हेही घटनास्थळी उपस्थित होते.

दुचाकीस्वार अडकला भीमसैनिकांच्या गराडय़ात

महामार्गावर भीमसैनिकांनी छेडलेल्या रास्तारोकोदरम्यान रूग्णवाहिका व स्कूल बस वगळता एकही वाहन मार्गस्थ होत नव्हते. चारही बाजुंनी भीमसैनिकांनी ठिय्या ठोकल्याने असंख्य वाहने रस्त्यातच अडकली होती. मात्र एक दुचाकीस्वार याच गर्दातून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने भीमसैनिकांचा पाराच चढला. भीमसैनिकांच्या गराडय़ात अडकलेल्या दुचाकीस्वारास पोलिसांनी मध्यस्थी करत सुरक्षित बाहेर काढले. यादरम्यान, पोलीस व भीमसैनिक यांच्यामध्ये शाब्दीक चकमकही उडाली.