|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » इंग्रजीसमोर मराठी शिक्षणाचे शुभवर्तमान !

इंग्रजीसमोर मराठी शिक्षणाचे शुभवर्तमान ! 

अनेक विद्यार्थ्यांनी धरला मराठी शिक्षणाचा परतीचा रस्ता

अजय कांडर / कणकवली:

कोणतीच भाषा कोणत्याच दुसऱया भाषेची दुष्मन नसते. इंग्रजी जरी जागतिक भाषा असली, तरीही मातृभाषा ही बौद्धिक विकासाची भाषा समजली जाते.  अलिकडल्या काळात इंग्रजीतून प्राथमिक शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागातही वाढत असताना सिंधुदुर्गातील गुणवंत शिक्षकांच्या प्रयत्नातून मात्र आता काही मराठी शाळांची घटती विद्यार्थी पटसंख्या वाढू लागली आहे. इंग्रजी शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा जि. प.च्या मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्गात कुडाळ, बांदा, शिरोडा, खारेपाटण, सावंतवाडी, तळेरे, वैभववाडी आदी भागांतील काही विद्यार्थ्यांनी आपले इंग्रजी माध्यमातील शिक्षण सोडून पुन्हा मराठी शिक्षणाचा परतीचा रस्ता धरला आहे. हे सिंधुदुर्गातील मराठी माध्यमातील शिक्षणाचे शुभवर्तमानच आहे! 

सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून वाडीवस्तीवर खडू-फळा योजनेंतर्गत शाळा सुरू करण्यात आल्या. शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले. त्यामुळे त्यावेळी विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रमाण जास्त दिसू लागले. मात्र, गावातून विविध कारणांनी पालकांचे स्थलांतर झाले. त्यामुळे मुलेही गाव सोडून जवळच्या तालुकास्तरावर शिक्षण घेऊ लागली. यामुळे आजही गावात जेवढी मुलं आहेत, तेवढी जि. प.च्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतायत. मात्र, ज्या गावात फारशी मुले नाहीत, अशा शाळा बंद केल्या जाऊ लागल्यात. त्यामुळे जिल्हय़ात सुमारे 1425 प्राथमिक शाळांपैकी 17 शाळा शून्य पटावर आल्या. तर दुसरीकडे तालुकास्तराबरोबरच गावाचे शहरात रुपांतर होत असलेल्या भागातही आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढू लागल्या. त्या शाळांचे संस्थाचालक आपल्या शाळेत शिक्षणाच्या विविध सुविधा दाखवू लागले. त्यातून इंग्रजी शाळांमध्ये आपल्या पाल्याला शिक्षण देण्याचे पालकांचे आकर्षण वाढले. त्यातून मराठी शाळांची पटसंख्या कमी होत जात असल्याची सार्वत्रिक चर्चा होऊ लागली. अशा परिस्थतीतही काही शाळांतील गुणवंत शिक्षकांनी आपल्या शाळेतील अन्य विषयांबरोबरच इंग्रजी विषयाचीही गुणवत्ता वाढविल्याने त्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढू लागली.

गावाचे शहरात रुपांतर होणाऱया खारेपाटण, बांदा, तळेरे, शिरोडा, कोकिसरे-वैभववाडी, शिरगाव आदी भागांच्या जवळच्या परिसरात इंग्रजी शाळा असताना तेथील जि. प.च्या प्राथमिक शाळांमध्ये मुलांची संख्या वाढती आहे. या जि. प.च्या शाळांनी इंग्रजी शाळांशी चांगली स्पर्धा करून आपली पटसंख्या वाढती ठेवली.  इथेही काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून पुन्हा जि. प.च्या शाळेत प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे कुडाळ-पडतेवाडी शाळेत आज घडीला पहिली ते चौथीपर्यंत तब्बल 475 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बांदा जि. प. शाळा नं 1 मधील मुलांची संख्या वाढत असून येथे सध्या 245 विद्यार्थी पटसंख्या आहे. गेल्या दोन वर्षात 37 विद्यार्थ्यांनी या शाळेत इंग्रजी माध्यमातून पुन्हा प्रवेश घेतला. चराठा (ता. सावंतवाडी) प्रा. शाळा नं. 1 ला आता सीबीएससी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. याला ओजस अभ्यासक्रम म्हटला जात असून जिल्हय़ातील असा अभ्यासक्रम मंजुरी मिळविणारी जि. प.ची ही एकमेव शाळा आहे. या शाळेत पूर्वी 88 मुले होती, आता इंग्रजी माध्यमातील मुलांनी या शाळेत प्रवेश घेतल्याने 131 पटसंख्या झाली आहे. कोकीसरे (ता. वैभववाडी) नारकरवाडी या शाळेची पटसंख्या 10 ते 15 होती, ती आता या शाळेतील शिक्षिका भारती पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांमुळे सुमारे 75 पर्यंत गेली आहे. मागच्या दोन वर्षात 13 मुले या शाळेत इंग्रजी माध्यमातील मुले दाखल झाली. त्यामुळे या शाळेचा एकही रुम प्रशासनाला वाढवावा लागला. खारेपाटण शाळा नं. 1 मधील शिक्षकांच्या गुणात्मक शिक्षणामुळे  गेल्या पाच वर्षात या शाळेत खूप बदल झाला असून 116 मुले या शाळेत सध्या शिक्षण घेत आहेत. या शाळेत चार मुले इंग्रजी माध्यमातील दाखल झाली आहेत. तळेरे भागातही आता इंग्रजी माध्यमातील शाळा असून तळेरे शाळा नं. 1 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. सध्या 232 विद्यार्थ्यांचा पट या शाळेत आहे. तर इळये (ता. देवगड) या शाळा नं. 1 ची पटसंख्या सुमारे 100, जामसंडे शाळा नं 1 ची पट संख्या 224, शिरोडा शाळा नं. 1 ची संख्या 140 अशी असून ही सर्व वाढती पटसंख्या निव्वळ त्या-त्या शाळांनी आपल्या शिक्षणाचा दर्जा वाढविल्यानेच वाढल्याचे काही पालक, शिक्षक आणि शिक्षण प्रशासन यांच्याशी संवाद साधल्यावर स्पष्ट झाले आहे.

रामचंद्र आंगणे

कौतुक करावे तेवढे थोडेच-उपशिक्षणाधिकारी आंगणे

  माध्यमिकचे जिल्हा उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे म्हणाले, सिंधुदुर्गात   कुटुंब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, रोजीरोटीसाठी गावाकडून शहराकडे होणारे कुटुंबांचे स्थलांतरण यामुळे दिवसेंदिवस वाडीवस्तीवरील लोकसंख्याच कमी होत आहे. याचा परिणाम प्राथमिक शाळांच्या पटसंख्येवरही होत आहे. परंतु जिल्हय़ातील काही गावे ही शहर म्हणून विकसीत होत असताना तिथे लोकसंख्येची वाढ होत आहे. त्या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळाही सुरू झाल्या आहेत. या शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जि. प. शाळांमध्ये गुणवत्ता टिकविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आता चांगल्याप्रकारे राबविले जात आहेत. यातून गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे. इंग्रजी, मराठी माध्यमाच्या शाळांमधील गुणवत्तेसाठी असणारी स्पर्धा, पालकांचे इंग्रजी माध्यमाबद्दल असणारे आकर्षण अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळांनी टिकविलेला दर्जा, विविध शालेय उपक्रम यामुळे अशा शाळांमधील वाढणारी पटसंख्या ही कौतुकाची बाब आहे.

श्रद्धा मुंज

मराठी शाळेतूनही चांगलं शिक्षण मिळतेय-श्रद्धा मुंज

कडावल येथील निहार मुंज हा होमी भाभा बाल वैज्ञानिक. तो इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षणासाठी पुन्हा मराठी माध्यमाकडे वळला. त्याच्या आई श्रद्धा मुंज म्हणतात, आमच्या लक्षात आले, की आमच्या मुलाला मराठीतून शिकविलेले सर्वच विषय सहज कळतात आणि आता आमच्या गावात जि. प.च्याही शाळेत अन्य विषयांबरोबरच इंग्रजीचेही चांगले शिक्षण मिळत आहे. त्यामुळे आमच्यात आणि आमच्या मुलात शिक्षणाबाबतचा चांगला संवादही होत गेला आणि त्यामुळेच तो बाल वैज्ञानिकही झाला.

दीपक बांदेकर

शाळेतील विविध उपक्रमांमुळे पुन्हा मराठीकडे वळलो-बांदेकर

बांदा येथील युक्ता बांदेकर ही विद्यार्थिनी इंग्रजी माध्यमातून पुन्हा जि. प.च्या शाळेत दाखल झाली, याबाबत तिचे वडील दीपक बांदेकर म्हणतात, बांदा जि. प. प्राथमिक शाळेत चांगले शिक्षण मिळत आहे. येथील शिक्षक उत्तम शिकवितात  विशेषतः मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवितात. शिक्षकांनीच पालकांचा एक ‘व्हॉट्सऍप ग्रुप’ केला असून त्या ग्रुपवर शाळेतील रोजच्या शिक्षणाची पालकांबरोबर चर्चाही करतात. त्यामुळेच आम्ही आमच्या मुलीला पुन्हा मराठी माध्यमात दाखल केले.

 

          शाळा                                                    पटसंख्या

कुडाळ-पडतेवाडी शाळा                                         475 

बांदा जि. प. शाळा नं. 1                                         245

चराठा प्रा. शाळा नं. 1                                            पूर्वी 88 मुले होती       आता 131 

कोकीसरे नारकरवाडी शाळा                                     पूर्वी 10 ते 15        आता 75

खारेपाटण शाळा नं. 1                                              116 

तळेरे शाळा नं. 1                                                     232

इळये शाळा नं. 1                                                     100

जामसंडे शाळा नं. 1                                                  224

शिरोडा शाळा नं. 1                                                   140

Related posts: