|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लॉज चालक, मालकावर गुन्हा दाखल करा

लॉज चालक, मालकावर गुन्हा दाखल करा 

सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पोलिसांकडे मागणी : प्रकरणाची सखोल चौकशी करा-शिवसेना

सावंतवाडी:

अल्पवयीन कॉलेज युवतीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी राजकारण तापले असून याप्रकरणी लॉजमालक, चालक आणि व्यवस्थापनावर कारवाई व्हावी, यासाठी मनसे, भाजप, शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने पोलीस ठाण्यावर धडक दिली. याप्रकरणी लॉजमालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, युवतीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचे प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले. शिवसेनेने याप्रकरणी गृहराज्यमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणाचा सर्वंकष तपास करावा, अशी मागणी केली. 

युवती अल्पवयीन असताना व ओळखपत्राशिवाय लॉज मालकाने संशयित आरोपीबरोबर रुममध्ये राहण्यास परवानगी देऊन सहकार्य केले. हा प्रकार निंदनीय व संशयास्पद आहे. त्यामुळे लॉज मालक, चालक, व्यवस्थापक व कर्मचाऱयांवर गुन्हे दाखल करावेत. सदरचे हॉटेल पोलिसांनी सील करावे. अन्यथा येत्या आठ दिवसात मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. हॉटेल मालक, चालक, व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करून भविष्यात सावंतवाडी परिसरातील लॉजवर असे गुन्हे घडू नये, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष निशांत तोरसकर यांनी केली आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर व उपनिरीक्षक अमित गोते यांच्याशी चर्चा करण्यात आली.

सहाय्यक निरीक्षक बाबर, उपनिरीक्षक गोते यांनी मनसे व भाजप युवा मोर्चा शिष्टमंडळाने केलेली मागणी रास्त आहे. आपल्या निवेदनाची निश्चितच दखल घेऊन कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, महिला जिल्हाध्यक्षा श्रेया देसाई, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, ऍड. राजू कासकर, सुधीर रसाळ, संतोष भैरवकर, विठ्ठल गावडे, आशिष सुभेदार, अतुल केसरकर, रामा देवळी, मंगेश पाटील, महेश बांदिवडेकर, प्रथमेश कातळकर, पिंटय़ा देसाई तसेच भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष निशांत तोरसकर, अजय सावंत, धनश्री गावकर, सूरज कारिवडेकर, ज्योतिबा टपाले, सुकन्या टोपले, महिला बालविकास विकास समितीच्या अध्यक्षा परिणीती वर्तक आदी उपस्थित होते.

स्वाभिमानकडून चर्चा

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघातील सावंतवाडीत मुलींवर अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. ही बाब लांच्छदनास्पद आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. मळगाव येथील लॉजमालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, गीता परब, मेघा गंगावणे, उपसभापती निकिता सावंत, सभापती पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी परब व पाताडे यांनी ज्या लॉजवर गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार करण्यात आला, तो लॉज बंद करण्यात यावा. मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

शिवसेनेचेही शिष्टमंडळ भेटीला

यावेळी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निरीक्षक धनावडेंची भेट घेतली. या भागात गुंगीचे औषध देणारी टोळी कार्यरत आहे, याबाबत चौकशी करावी. तसेच रेल्वे कर्मचाऱयांचीही चौकशी करावी. या खटल्यात विशेष सरकारी वकील नेमावा, अशी मागणी केली. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, नारायण राणे, गजानन नाटेकर, प्रकाश बिद्रे, रश्मी माळवदे, शैलजा पारकर, ऍड. नीता सावंत-कविटकर, राघोजी सावंत आदी उपस्थित होते.

दरम्यान, चाईल्ड लाईनचे संचालक नकुल पार्सेकर, सदस्या पूजा जगताप, सत्यभामा परब, समूपदेशक नमिता परब यांनी अत्याचारग्रस्त मुलीचे समूपदेशन केले.   

Related posts: