|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तब्बल 34 घरफोडय़ांची कबुली

तब्बल 34 घरफोडय़ांची कबुली 

घरफोडय़ांची कबुली

6 सावंतवाडी, 5 कणकवली, 6 देवगड

सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील घरफोडय़ांचा टोळीचा सूत्रधार जेरबंद : स्थानिक गुन्हा अन्वेषणची मध्यप्रदेशात कारवाई : एकूण पाचजणांची टोळी : अन्य चौघांची माहिती हाती

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात घरफोडय़ा करणाऱया टोळीमधील मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पाचजणांच्या टोळीचा प्रमुख म्होरक्या असलेला मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्हय़ातील तेजराम नानुराम प्रजापती याला अटक करण्यात आली आहे. त्याने पोलीस तपासात सावंतवाडी, कणकवली, देवगड तसेच रत्नागिरी जिल्हय़ातील चिपळूण, गुहागर येथील 34 घरफोडय़ांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून स्विफ्ट कार आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, संशयिताला देवगड न्यायालयासमोर हजर केले असता 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निमित गोयल, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.

मागील काही महिन्यात सावंतवाडी-सर्वोदयनगर, कणकवली जयभवानी कॉम्प्लेक्स आणि गणपतीच्या आदल्या दिवशीच 12 सप्टेंबरला जामसंडे टिळकनगर येथे घरफोडय़ा होऊन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेली होती. याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेमार्फत सुरू करण्यात आला. यासाठी विशेष पथक तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगार व इतर राज्यातील तसेच जिल्हय़ातील रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेण्यात आली. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित व्यक्ती मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्हय़ात कुक्षी गावात राहात असल्याची माहिती मिळाली.

आठवडा बाजारात पकडले

स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथक उपनिरीक्षक रविराज फडणीस, हवालदार सुधीर सावंत, पोलीस नाईक अनिल धुरी, आर. एम. इंगळे, एस. एस. खाडय़े, ए. ए. गंगावणे यांच्या पथकाने मध्यप्रदेशात जाऊन सापळा रचला. धार जिल्हय़ातील कुक्षी हा गाव घनदाट जंगलाचा असून तेथे जाणे कठीण असते. तेथे भिल्ल समाजाची वस्ती आहे. त्यामुळे ते आठवडा बाजारात येण्याची वाट पाहावी लागली. शनिवारी तेजराम नानुराम प्रजापती आठवडा बाजारात आला असता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले. त्यानंतर त्याच्याकडून 7 हजार 500 रुपयाची रोख रक्कम आणी स्विफ्ट कार (एसपी-04-सीई-1906) जप्त केली.

पाचजणांची टोळी

घरफोडय़ा करणाऱया टोळीचा मुख्य सूत्रधार तेजराम प्रजापती असून त्याच्या सोबत आणखी चौघेजण आहेत. पाचजणांची टोळी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ात घरफोडय़ा करत असल्याची कबुली प्रजापती याने दिली. दोन्ही जिल्हय़ात एकूण 34 घरफोडय़ा केल्या असून सावंतवाडीत सहा, कणकवलीत पाच, देवगडमध्ये सहा, गुहागरमध्ये पाच, चिपळूणमध्ये आठ व अन्य ठिकाणी चार घरफोडय़ा केल्याचे प्रजापती याने कबूल केले आहे.

अन्य चौघांचा शोध घेणार

प्रजापती याला देवगड न्यायालयासमोर हजर केले असता 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. त्यामुळे पोलीस तपासात अजूनही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त केला जाणार आहे. तसेच घरफोडय़ा टोळीतील अन्य चौघांची नावे व पत्तेही मिळाले आहेत. त्यामुळे त्यांनाही लवकरच जेरबंद केले जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक गेडाम यांनी दिली.

Related posts: