|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कामळेवीर बाजारपेठेत भीषण आग

कामळेवीर बाजारपेठेत भीषण आग 

मेडिकल स्टोअर बेचिराख : ई-सेवा केंद्र, कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरलाही आग  : 25 लाखाची हानी

औषध साठय़ासह फर्निचर, कॉम्प्युटर, अन्य साहित्य जळाले

वार्ताहर / कुडाळ:

कुडाळ तालुक्यातील झाराप-कामळेवीर बाजारपेठेतील गुरुकृपा मेडिकल अँड जनरल स्टोअर्सला रविवारी रात्री भीषण आग लागली. जयवंत सहदेव वेंगुर्लेकर यांच्या मालकीच्या या मेडिकलसह पाठिमागील भागातील त्यांचेच गुरुकृपा पतंजली उत्पादने विक्री केंद्र, ई सेवा केंद्र व कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमधील फर्निचर, चार कॉम्प्युटर, दोन प्रिंटर, झेरॉक्स मशीन, फ्रिज तसेच औषध साठय़ासह सर्व साहित्य जळून खाक झाले. यात 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. रात्री 11.45 च्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आले. औषध बाटल्या तसेच फ्रिजचा स्फोट झाला. वृत्त समजताच ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने तेथे धाव घेतली. दोन अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या सहाय्याने पहाटे 4 च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

झाराप-कामळेवीर बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी जयवंत वेंगुर्लेकर यांच्या मालकीचा गुरुकृपा मेडिकल ऍण्ड जनरल स्टोअर्स आहे. काल रात्री 9.45 च्या सुमारास ते मेडिकल बंद करून घरी गेले. त्यांच्या या मेडिकलच्या पाठीमागील भागात पतंजली उत्पादने विक्री केंद्र, ई सेवा केंद्र, कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरचा त्यांचाच व्यवसाय आहे.

फटाके वाजत असल्यासारखा आवाज

काल रात्री 11.45 च्या सुमारास संजय गवळी कामावरून घरी जात होते. ते मेडिकल इमारतीच्या मागे राहतात. तेथून जात असताना त्यांना मेडिकलमध्ये फटाके वाजत असल्यासारखा आवाज ऐकू आला. त्या परिसरात आगीचा धूर दिसला. तेव्हा मेडिकल आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वेंगुर्लेकर यांना घटनेची तात्काळ कल्पना दिली.

ग्रामस्थांनी घेतली धाव

तेथून काही अंतरावर राहत असलेले वेंगुर्लेकर यांनी घटनास्थळी येत कुडाळ पोलिसांना कल्पना दिली. या घटनेचे वृत्त परिसरात समजताच कामळेवीरसह परिसरातील ग्रामस्थांनी तेथे मोठय़ा संख्येने धाव घेतली.

पोलीस व अग्निशमन दल दाखल

कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदानंद सावळ, विनायक पवार तसेच वेंगुर्ले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. कुडाळ एमआयडीसी तसेच सावंतवाडी नगरपालिकेचे अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले. त्याद्वारे पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. आग पहाटे 4 च्या सुमारास पूर्णत: आटोक्यात आणण्यात आली. ग्रामस्थांनी या मदतकार्यात सहभाग घेतला.

अन्यथा आग अन्यत्र पसरली असती

या बाजारपेठेत मेडिकलला लागून अन्य दुकाने आहेत. त्याच्या बाजूला मातीच्या इमारतीत बेकरी आहे. मेडिकल स्लॅबच्या इमारतीत असल्याने आगीच्या ज्वाळा बाहेर आल्या नाहीत. अन्यथा आग बाहेर पसरली असती आणि अन्य दुकानांनाही मोठा धोका पोहोचला असता.

प्रथम फ्रिजचा स्फोट झाला

बाजारपेठेनजीक काही लोकवस्ती आहे. प्रथम फ्रिजचा स्फोट झाला. मेडिकलमधील औषधांच्या बाटल्यांचाही स्फोट होत होता. शोकेसच्या काचा आगीने फुटू लागल्या. हा आवाज ग्रामस्थांना ऐकू येत होता. गणेश चतुर्थी असल्याने फटाके वाजवत असतील, त्याचा आवाज असावा, असा समज तेथील ग्रामस्थांचा झाला.

साहित्य बेचिराख

मेडिकलच्या पाठीमागील भागात कॉम्प्युटर प्रशिक्षण सेंटर व ई-सेवा केंद्र तसेच पतंजली उत्पादने विक्री केंद्र आहे. ही आग दोन्ही भागात पसरली. आतील संपूर्ण सामान बेचिराख झाले. विविध प्रकारचा औषधसाठा, फर्निचर, चार कॉम्प्युटर, झेरॉक्स मशीन, दोन प्रिंटर, फ्रिज तसेच अन्य साहित्य मिळून 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. हवालदार भगवान चव्हाण व मंगेश जाधव यांनी पंचनामा केला. जयवंत वेंगुर्लेकर यांनी पोलिसांत खबर दिली.

महत्वाची कागदपत्रे खाक

वेंगुर्लेकर यांनी विमा पॉलिसी तसेच प्रमाणपत्र, परवाना व अन्य महत्वाची सर्व कागदपत्रे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये ठेवली होती. या आगीत ही सर्व कागदपत्रे जळून खाक झाली. वेंगुर्लेकर यांचा गेली 27 वर्षे त्या बाजारपेठेत मेडिकलचा व्यवसाय आहे. प्रथमत: भाडय़ाच्या जागेत होता, तर अलिकडे सहा-सात वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:च्या इमारतीत हा व्यवसाय स्थलांतरित केला होता. त्याच जागेत हे जोड व्यवसायही सुरू केले होते. या घटनेने काही वेळात होत्याचे नव्हते झाले.

काचा, औषधांच्या बाटल्यांचा स्फोट

मेडिकल असलेली ही इमारत स्लॅबची आहे. आत आग भडकली. तसेच बाहेर फक्त धूर पसरला होता. आतील शोकेसच्या काचा, औषधांच्या बाटल्यांना आगीमुळे तडा जाऊन त्या फुटत होत्या. त्यामुळे मेडिकल व पतंजली उत्पादन विक्री केंद्राचे शटर उघडण्याचे धाडस प्रथमत: कुणी केले नाही. तसेच मेडिकलचे दुकान स्लॅबचे असल्याने औषध साठय़ामुळे आत गॅस तयार झाला. त्या गॅसच्या प्रेशरने मेडिकलच्या दर्शनी भागाचे शटर वाकले.