|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » 29 सप्टेंबरपासून परतीचा पाऊस

29 सप्टेंबरपासून परतीचा पाऊस 

हवामान विभागाची माहिती : येत्या 24 तासात कर्नाटकात जोरदार पाऊस

पुणे / प्रतिनिधी

येत्या 29 सप्टेंबरच्या आसपास देशातून परतीच्या पावसास सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. दरम्यान, हरियाणा व लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, चंदीगडसह अरुणाचल प्रदेश आसाम मेघालयात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढील 24 तासांत उत्तराखंडसह आसाम मेघालय, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यावर्षी परतीचा मान्सून लांबला आहे. राजस्थान, हरियाणा व लगतच्या भागावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. आता याचा प्रभाव कमी होत असून, त्यामुळे या भागातील पाऊसही कमी होणार आहे. मंगळवारपासून पश्चिम राजस्थानच्या भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागातील आर्द्रतेचे प्रमाणही कमी होणार असून, वाऱयाच्या गतीमध्येही 27 सप्टेंबरपासून बदल होणार आहे. त्यामुळे 29 सप्टेंबरच्या आसपास या भागात पश्चिम राजस्थानच्या भागातून परतीच्या पावसास सुरुवात होण्याचा अंदाज आहे.

कमी दाबाचे क्षेत्र

 राजस्थान, उत्तर प्रदेश व दक्षिण हरियाणाच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन हरियाणाच्या भागावर आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय पूर्वोत्तर राज्ये तसेच दक्षिणेकडे पुढील 4 ते 5 दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.