|Friday, May 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पण लक्षात कोण घेतो

पण लक्षात कोण घेतो 

गणेशोत्सवाच्या गडबडीत घराजवळच्या चौकात पाहिलेली घटना. संध्याकाळची ऑफिसेस सुटण्याची आणि नोकरदार लोक घाईघाईने घरी जाण्याची वेळ होती. चौकातल्या दुकानात भाजी घेत होतो. कोपऱयावर एक पोलीस वाहतूक पोलीस आणि एक पाठीत वाकलेला वृद्ध काठी घेऊन उभे होते. चेहरेपट्टीवरून वृद्ध माणूस त्याचा मोठा भाऊ किंवा वडील असावा. त्या वृद्धाला घरी जायचे होते. एक रिक्षा थांबवली. पण रिक्षाचालक म्हणाला, त्या बाजूचे रस्ते अरुंद आहेत. मांडव घातलाय. रिक्षा नेता येणार नाही. खूप लांबून जावं लागेल. पोलिसाने मान हलवली आणि समोरून येणाऱया मोटरसायकलस्वाराला थांबवण्यासाठी हात केला. मोटरसायकल त्या अरुंद रस्त्यावरून जाऊ शकेल.

पण पोलिसाने हात केल्यावर मोटरसायकलस्वार न थांबता वेग वाढवून पळाला. एवढेच नव्हे तर पाठीमागून येणारे दोन दुचाकीस्वार दचकले. त्यांना वाटले असेल की पोलिसांनी वाहनचालकांना अडवायला सुरुवात केली. त्यांनी घाईघाईने ब्रेक मारले आणि यू-टर्न मारून पळाले. त्यातल्या एकाने समोरून येणाऱया दोघांना ओरडून मागे वळायला सांगितले. पोलीस जाम चरफडला. त्याने बरोबरच्या वृद्धाला एका दगडावर बसायला सांगितले.

त्या दुचाकीस्वारांचे काही चुकले का? ते ऑफिसमधून घरी निघाले असतील. त्यांना घरी पोचायची घाई असेल. कोणताही सिग्नल तोडलेला नसताना पोलिसाने हात करून थांबायला सांगितले याचा अर्थ आपला काही वेळ कागदपत्रे दाखवण्यात जाणार, कदाचित त्यात पोलीस एखादी त्रुटी काढून आपल्याला छळणार अशी त्यांना भीती वाटली असेल. सामान्य माणसाच्या मनात पोलिसाची अशीच प्रतिमा असते. पोलीस चौकीवर तक्रार करायला गेलं तर तिथे निघणारा हद्दीचा मुद्दा सर्वज्ञात आहे. पण वाहतूक पोलिसांना हद्दीचा मुद्दा नसतो. ते कुठेही आणि कोणालाही अडवू शकतात अशी भावना. पोलिसाऐवजी दुसऱया कोणी हात केला असता तर दुचाकीस्वार नक्की थांबला असता. लिफ्ट दिली असती किंवा नसती. पण थांबला तरी असता. आणि पाठीमागून येणारे दुचाकीस्वार असे यू टर्न घेऊन पळाले नसते.

पोलीस हा समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे. समाजाच्या मनात त्या घटकाविषयी भीतीची किंवा रागाची भावना असायला नको. यासाठी पोलिसांनी दोन पावले पुढे यावे आणि नागरिकांनी दोन पावले पुढे जात प्रतिसाद द्यायला हवा असे वाटते.

पण लक्षात कोण घेतो?

Related posts: