|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती

हायवेचे कणकवलीतील काम आठवडाभरात हाती 

प्रकल्पग्रस्तांमधून मागण्या मान्य होण्यासाठी होता कामाला विरोध : आश्वासनांची पूर्तता नाहीच : दोन गुणांकाची आशाही मावळली

दिगंबर वालावलकर / कणकवली:

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याच्या हालचाली महामार्ग प्राधिकरण व दिलीप बिल्डकॉन एजन्सीमार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या आठवडाभरात शहरातील काम सुरू करणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांकडून देण्यात आली. कणकवलीतील मोबदला वाटपाचे काम काही प्रमाणात धिम्या गतीने सुरु असले, तरी ज्या भागातील मोबदला वाटप पूर्ण झाले व जमीन महामार्ग प्राधिकरणच्या ताब्यात आली, तेथील कामाला प्राधान्य देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच शहरातील रखडलेल्या फ्लाय ओव्हर ब्रिजचे कामही सुरु करण्यात येणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली शहरात लवकरच हायवे चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाल्याचे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवातीपासून या-  ना त्या कारणामुळे विरोध झाला होता. सुरुवातीला कणकवली शहरातील बॉक्सेल पुलाला विरोध झाल्यानंतर शहरातून हायवेचे काम करण्याऐवजी बायपास करण्याची मागणी पुढे आली. मात्र बायपासला शहरवासीयांतून विरोध झाल्यानंतर शहरातून फ्लाय ओव्हर ब्रिज करण्याची मागणी पुढे आली. त्यानंतर भाजप-शिवसेनेने फ्लाय ओव्हर ब्रिज करण्यासाठी पुढाकार घेतला. खासदार विनायक राऊत यांनी फ्लाय ओव्हर ब्रिज मंजूर करून आणल्याचे सांगत हा फ्लाय ओव्हर ब्रिज कसा असणार, त्यांची लांबी, रुंदी याबाबत माहिती दिली होती. कणकवलीवासीयांच्या आक्रमकतेनंतर अखेर शहरात फ्लाय ओव्हर ब्रिज मंजूरही झाला. त्यानंतर शहरातील काम सुरु होईल, अशी अपेक्षा असताना मात्र हायवे चौपदरीकरण बाधितांच्या मालमत्तांचे चुकीचे मूल्यांकन व ग्रामीणच्या तुलनेत मिळत असलेला कमी मोबदला हा विषय समोर आला व पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांनी हायवे कामाच्या विरोधात एल्गार पुकारला.

आंदोलनामुळे प्रशासन अडचणीत

कणकवली शहरातील बहुतांशी बाधित मालमत्तांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चुकीच्या पद्धतीने झाल्याची बाब समोर आली आणि प्रकल्पग्रस्तांनी हायवे प्राधिकरण व एजन्सीच्या कामाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यासाठी शहरातील गांगो मंदिर येथे तर प्रकल्पग्रस्तांच्या बैठकांमधून विरोधाची दिशा ठरु लागली आणि प्रशासन अडचणीत सापडू लागले. यात ‘कणकवली बंद’सारखे आंदोलनही महत्वपूर्ण ठरले होते. प्रशासनाकडून देण्यात येत असलेले स्पष्टीकरण प्रकल्पग्रस्तांना मान्य नसल्याने हे काम सुरु होण्याचा गुंता अधिकच वाढत जात होता. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनीही प्रकल्पग्रस्तांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची कणकवली शहरातील हायवे बाधित शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी अनेक आश्वासने देण्यात आली. मात्र आजमितीपर्यंत यातील एकही आश्वासन पूर्ण झाली नसल्याची खंत प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे.

नीतेश राणेंच्या भूमिकेनंतर आंदोलन तीव्र

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक नाही, असा नाराजीचा सुर आळवत प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाची धार तीव्र केली. असे असताना आमदार नीतेश राणे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभे राहत आक्रमक भूमिका घेतली. याच दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी हायवेत बाधित होत असलेल्य ज्येष्ठ नागरिकांचे उपोषणास्त्र उपसले. मात्र प्रशासनाने त्याची फारशी गांभिर्याने दखल घेतली नाही. हीच बाब आंदोलन तीव्र होण्यास अजून कारणीभूत ठरली. आमदार राणे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करीत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना जाब विचारला. हे आंदोलन कणकवली हायवे चौपदरीकरण करण्याच्या कामाला महत्वाचा ब्रेक देणारे ठरले. त्यानंतर वारंवार आमदार राणे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, असा थेट इशारा दिला व त्यानंतर दोनवेळा कणकवली शहरातील दिलीप बिल्डकॉन एजन्सीने सुरु केलेले काम स्वाभिमानच्या कार्यकर्त्यानी बंद पाडले. फ्लाय ओव्हर ब्रिजखालील सर्व्हीस रोड रद्द करण्याच्या मागणीवरून प्रकल्पग्रस्तांमध्ये दोन गट पडले होते. मात्र सहा मिटरचा सर्व्हीस रोड होणार हे देखील नुकतेच स्पष्ट झाले.

जागा ताब्यात घेण्याची मागणी

दरम्यान हायवेत ज्या इमारती बाधित होत आहेत, त्यांचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा काही प्रकल्प बाधितांचा आक्षेप आहे. माजी आमदार राजन तेली यांची जमीन व इमारतीचा काही भाग चौपदरीकरणात बाधित होत आहे. तेली यांनी आपल्या बाधित जागेचा मोबदला स्वीकारत हायवे चौपदरीकरणात मोबदला स्वीकारलेली जागा मोकळी करून हायवेच्या ताब्यात घ्या, अशी मागणी प्रांताधिकाऱयांकडे केली आहे.

शहरातील कामाचे काऊंटडाऊन सुरू

नुकत्याच जिल्हा दौऱयावर आलेल्या बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी कणकवली शहरातील काम लवकरच सुरू होणार असे संकेत दिले होते. तसेच शहरातील प्रकल्प बाधितांच्या मागणीनुसार दोन गुणांक देता येणार नाही व 45 मीटरऐवजी 30 मीटरमध्ये शहरातील चौपदरीकरण करा, ही देखील मागणी पूर्ण करता येणार नसल्याचे बांधकाममंत्र्यांनी स्पष्ट केल्याने आता शहरातील चौपदरीकरणाचे काम सुरु होण्याचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी संपर्क साधला असता येत्या आठवडाभरात शहरातील चौपदरीकरणाचे काम सुरु करण्याचे संकेत देण्यात आले. खारेपाटण ते ओसरगावपर्यंत चौपदरीकरण पावसाच्या उघडिपीनंतर युद्धपातळीवर सुरु आहे. शहरातील काम सुरु करताना सुरुवातीला फ्लाय ओव्हर ब्रिजच्या पिलरचे काम सुरु करण्यात येणार असून, उर्वरित कामाला टप्प्या-टप्प्याने गती देण्यात येणार असल्याची माहिती हायवे प्राधिकरणकडून देण्यात आली.

Related posts: