|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाणी सुरू होण्यासाठी कायद्यात बदल करावा

खाणी सुरू होण्यासाठी कायद्यात बदल करावा 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करावा, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय खाण मंत्रालयाला पाठविले आहे. मुख्यमंत्री सध्या दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेत आहेत. तेथूनच त्यांनी सोमवारी हे पत्र पाठविले आहे. एमएमडीआर कायद्यात तरतूद करून गोव्यातील खाणी सुरू करण्यासंदर्भात मदत करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जी विद्यमान लिजे रद्दबातल ठरविली आहेत, ती सुरू करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात यावी, जेणेकरून गोव्यातील खाण व्यवसाय सुरू करणे शक्य होणार आहे. खाण व्यवसाय बंद असल्यामुळे खाणीवर अवलंबून असलेल्या लोकांवर कायदा हातात घेण्याची पाळी येत आहे. त्याचबरोबर खाणबंदीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडण्याची पाळी आल्याचेही अहवाल येत आहेत. गुन्हेगारीमध्येही वाढ झाल्याचे अहवालसमोर येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

आजारपणामुळे दुसरी बैठक होऊ शकली नाही

या अगोदर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनय तेंडुलकर यांच्यासह दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य संबंधित मंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी गोव्यातील खाण अवलंबित व राज्याच्या अर्थव्यवस्थेचे चित्र पंतप्रधानांसमोर मांडले होते. त्यानंतर खाणीसंदर्भात दुसरी बैठक महिनाभराच्या कालावधीत होणार होती. मात्र पर्रीकरांच्या आजारपणामुळे दुसरी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी खाण मंत्रालयाला पत्र पाठविले आहे.

या हंगामात तरी खाणी सुरु व्हाव्या

राज्यात पुढील महिन्यापासून खाण हंगाम सुरू होतो. त्यामुळे या हंगामात तरी खाण व्यवसाय सुरू व्हावा, अशी मागणी आहे. सरकारनेही खाण अवलंबितांना खाणी लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होत असल्याने कोणत्याही परिस्थितीत राज्यातील खाण व्यवसाय सुरू करा, अशी मागणी राज्यातील भाजप आमदार करत आहेत. लोकसभा निवडणुकीत खाणबंदीचे परिणाम दिसून येण्याची शक्यताही केंद्रीय नेत्यांसमोर मांडली आहे. त्यामुळे आता पर्रीकर यांनी केंद्रीय खाण मंत्रालयाला पत्र पाठविले आहे.