|Friday, May 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बा गणराया, गोंयकारांचे आरोग्य चांगले ठेव महाराजा!

बा गणराया, गोंयकारांचे आरोग्य चांगले ठेव महाराजा! 

 गोव्यात यंदा अनेक गणेशभक्तांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कटाक्ष होता. आज आम्ही समस्त गोमंतकीय गणेशभक्त ‘श्रीं’कडे एकच मागणे मागू शकतो, ‘बा गणराया, आमच्या गोवा राज्यावर येणारी विघ्ने दूर कर महाराजा, गोंयकारांचे आरोग्य चांगले ठेव महाराजा!’

 

गोव्यात गणेशोत्सवाची धामधूम अद्याप सुरू आहे. दीड दिवशीय, पाच, सात, नऊ, अकरा दिवशीय, अनंत चतुर्दशी, सार्वजनिक गणेशोत्सव यांची सांगता झाली असली तरी अजून गोव्यात काही ठिकाणी 21 दिवशीय गणेशोत्सव सुरू आहेत. माशेल, कुंभारजुवे येथील 21 दिवशीय वैशिष्टय़पूर्ण, कलात्मक गणेशमूर्ती व देखाव्यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक गणेशभक्तांची पावले त्या दिशेने वळत आहेत. गोव्यात येणारे पर्यटकही या ठिकाणी आवर्जून भेट देऊन आगळय़ावेगळय़ा गणेशमूर्ती व देखाव्यांचे दर्शन घेऊन तृप्त होतात. गणेशोत्सवासाठी लागणाऱया माटोळी सामानाची यंदाही लाखोंची उलाढाल झाली. पावसानेही कृपा केल्याने ग्राहक व व्यापाऱयांची गैरसोय झाली नाही.

गोव्यात आज काही गावे वगळता प्रत्येक गावात सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात होत आहेत. लॉटरी, देणगी स्वरुपात मोठय़ा प्रमाणात आर्थिक गंगाजळीही निर्माण झाल्या असतीलच. हा निधी सत्कारणी लागणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये काही गणेशोत्सव मंडळांनी झालेल्या आर्थिक लाभातून शाळा दत्तक योजना, गरीब घटकांसाठी मदत तसेच काही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील पावले उचलणे आवश्यक आहे. केवळ उत्सवापुरतेच सीमित न राहता मंडळाचे उपक्रम वर्षभर चालू राहणे अत्यावश्यक ठरते. यातूनच समाज, पर्यायाने गोवा राज्य एका वेगळय़ा दिशेने वाटचाल करील, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. आज गोव्यात अनेक समस्या भेडसावत आहेत. अनेक संकटे ‘आ’ वासून उभी आहेत. यावर मात करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दक्ष राहणे तसेच उपाययोजना आखण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.

.गोव्याच्या पर्यावरणावरही संकट येऊ घातले असून राजकारणी आपापल्या सोयीनुसार माडाच्या झाडाला ‘गवत’ करतात व नंतर त्याला राज्य वृक्षाचा दर्जा प्राप्त होतो. असे चमत्कार गोव्यात घडत आहेत. पायाभूत साधन सुविधा विकसित करताना सरकारकडून जंगल संपत्तीचा ऱहास होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने राजकारण्यांवर कितपत भरवसा ठेवावा, हा देखील प्रश्न आहे.

आज गोव्यात अमली पदार्थ सेवन करणारी युवा पिढी निर्माण होत आहे. ड्रग्जविरोधी मोहिमेचा धडाका सुरूच असून पोलिसांचे छापासत्र जरी सुरू असले तरी किरकोळ आरोपीच पकडले जातात. मुख्य धेंडापर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यात गांभीर्याने लक्ष घालून अमली पदार्थ विरोधी मोहीम आखणे, जागृती करणे आवश्यक ठरते. आज गोवा पायाभूत साधनसुविधांमध्ये अग्रेसर असला तरी आरोग्याच्यादृष्टीने ढासळलेला आहे. गोव्याचे बहुतेक आमदार, मंत्री आजारी असून खुद्द मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर दिल्लीतील ‘एम्स्’मध्ये उपचार सुरू आहेत. गोमंतकीय संस्कृतीसाठी झटणारे माजी आमदार विष्णू वाघ यांच्यासारखे नेतृत्व आज गंभीर आजारपणामुळे शरपंजरी आहेत. एकूण मंत्री, आमदार आजारी पडण्यामागे कारणे शोधून काढणे आरोग्य तज्ञांसमोर आव्हान आहे. आज सत्तरी तालुक्यात माकडतापाचा प्रादुर्भाव आहे. ‘निपाह’सारखा रोगही गोव्यात येण्याची शक्यता दिसून येत आहे. तसेच हल्लीच मडगावात ‘स्वाईन फ्लू’मुळे एका महिलेला मृत्यू येण्याची घटना घडली असून त्यामुळे या विषाणूची धास्ती पुन्हा एकदा पसरली आहे. ‘स्वाईन फ्लू’ला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. आज संपत्ती नको मात्र आरोग्य चांगले असावे, अशी आता प्रत्येक गोमंतकीयांची धारणा झालेली आहे. आज सरकारी तिजोरीतून कित्येक कोटी रु. खर्चून आजारी मंत्री, आमदारांवर उपाय तेही गोव्याबाहेर सुरू आहेत मात्र आज सामान्य गोंयकारांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाऐवजी दुसरा मार्ग नाही. मंत्री, आमदारांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयांच्या उपचारांवर विश्वास नाही. ते गोव्याबाहेरील हॉस्पिटलांमध्ये उपचार घेतात. यामुळे सामान्य गोमंतकीयांनी या ‘गोमेकॉ’वर कितपत भरवसा ठेवावा. त्यांच्या नशिबी केवळ मरणेच बाकी म्हणावे लागेल. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सुविधा सुधारणार तरी कधी? उपचारांसाठी गोव्याबाहेर जाण्याची पाळी आमदार, मंत्री तसेच सामान्य गोमंतकीयांवर येऊ नये, यासाठी गोमेकॉ सुसज्ज हॉस्पिटल बनणार तरी कधी असा सवाल उपस्थित होत आहे.

गोवा राज्याची मदार केवळ पर्यटन व खाण व्यवसायावर आहे परंतु खाण व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे. खाणी सुरू व्हाव्यात यासाठी ग्रामस्थांनी गणपतीसमोर गाऱहाणे मांडले आहे. तसेच गणेश दर्शनासाठी येणाऱया आमदार, मंत्र्यांनाही साकडे घातले आहे. सोनशी-सत्तरी भागातील एक उद्योजक प्रकाश गावस यांनी तर आपल्या गणपतीसमोर खाण उत्खननाच्या आठवणींना उजाळा देणारा एक आगळावेगळा देखावा सादर केला. या देखाव्यामुळे खाणी सुरू करण्याची सुबुद्धी लोकप्रतिनिधींना व्हावी, या हेतूने त्यांनी हा खटाटोप केला. यंदा मात्र अनेक गणेशभक्तांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कटाक्ष होता. दारुकामाची आतषबाजी अधिक प्रमाणात दिसून आली नाही. थर्माकोलचा वापरही कमी प्रमाणात आढळला. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने गोंयकार आज जागरुक बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.   आज आम्ही विद्यमान स्थितीत समस्त गोमंतकीय गणेशभक्त ‘श्रीं’कडे एकच मागणे मागू शकतो, ‘बा गणराया, आमच्या गोवा राज्यावर येणारी विघ्ने दूर कर महाराजा, गोंयकारांचे आरोग्य चांगले ठेव महाराजा!’

राजेश परब

Related posts: