|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अवैध गर्भपातप्रकरणी जयसिंगपूरच्या एजंटला अटक

अवैध गर्भपातप्रकरणी जयसिंगपूरच्या एजंटला अटक 

रूग्णवाहिका चालकाचा व्यवसाय करत डॉ. चौगुले ला गर्भपातासाठी ग्राहक पुरवत असल्याने अटक

प्रतिनिधी/ सांगली

 येथील गणेशनगरमधील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी पोलिसांनी एजंटगिरी करणाऱया रूग्णवाहिका चालकाला अटक केली आहे. खालिद म्हामूलाल मकानदार (32, रा. नांदणी रोड शिरोळ) असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा आकडा पाचपर्यंत पोहाचला आहे. या गुह्यातील मुख्य संशयित आणि चौगुले हॉस्पिटलचा मालक डॉ. स्वप्नील जमदाडे याचा अटकपूर्व जामिन अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला आहे. पण, अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती डीवायएसपी अशोक विरकर यांनी दिली.

 गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात होत असल्याची तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने हे हॉस्पिटल सील केले आहे. तर डॉ. रूपाली आणि पती विजयकुमार चौगुले या दाम्पत्याला अटक केली. त्यानंतर औषध विक्रेता सुजित कुंभार याला गर्भपाताची औषधे पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चौगुले हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी रूग्ण पाठवत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विटा येथील डॉ. अभिजीत महाडिक याला अटक करण्यात आली आहे. या सर्वांना 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू असताना नांदणी रोड शिरोळ येथील खालिद मकानदार हा रूग्णवाहिका चालक एजंटचे काम करत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे मंगळवारी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. तो डॉ. रूपाली चौगुलेकडे एजंटगिरी करत असल्याचे स्पष्ट झाल्याने मंगळवारी उशीरा त्याला अटक करण्यात आली. बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 28 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 दरम्यान, बेकायदा गर्भपात प्रकरणातील चौगुले हॉस्पिटल हे मुख्य संशयित डॉ. रूपाली चौगुले हिचा भाऊ डॉ. स्वप्नील जमदाडे याच्या नावावर आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसारच आहे. त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही फेटाळण्यात आला आहे. मंगळवारी त्याचा अटकपूर्व जामिनअर्ज फेटाळला असल्याने आता पुढचा क्रमांक त्याचा लागण्याची शक्यता आहे.